वादातून कापले मित्राचे गुप्तांग; मग त्यांनीच नेले रुग्णालयात, डोंबिवलीजवळील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 06:27 AM2023-01-12T06:27:50+5:302023-01-12T06:44:11+5:30
पीडित संजयकुमार आणि आरोपी सोनुकुमार हे एमआयडीसीमधील एकाच कंपनीत कामाला आहेत.
डोंबिवली : मित्राच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयातून वाद विकोपाला गेल्याने तिघांनी संजयकुमार मुन्शीराम राम या मित्राचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीनजीकच्या गोळवली परिसरात सोमवारी मध्यरात्री घडली. यात ३९ वर्षीय संजयकुमार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल केले आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून सोनुकुमार सियाराम राम (३२), करणराम आश्रय राम (२८), सुरेंद्रकुमार रमेश राम (३२) अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला. ते चौघेही गोळवली इथल्या एका चाळीतील खोलीमध्ये एकत्र राहत होते.
पीडित संजयकुमार आणि आरोपी सोनुकुमार हे एमआयडीसीमधील एकाच कंपनीत कामाला आहेत. दोघांमध्ये कौटुंबिक वाद निर्माण झाले होते. सोमवारी मध्यरात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने करणराम आणि सुरेंदकुमार यांनी त्या व्यक्तीचे हात-पाय पकडले आणि सोनुकुमारने त्याच्याकडील धारदार वस्तूने वार करून संजयकुमारचे गुप्तांग कापले. गंभीर जखमी झालेल्या संजयकुमार याच्यावर जे. जे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
तिघांपैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र अन्य काही कारण आहे का? याचा तपास पोलिस करीत आहेत. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा गुन्हा तिघांवर दाखल झाला आहे.
तिघांनीच त्याला नेले रुग्णालयात
संजयकुमारचे गुप्तांग कापल्यावर तो गंभीर जखमी झाल्यावर त्याला तिघांनी मध्यरात्री रिक्षातून नजीकच्या खासगी रुग्णालयात नेले. प्रकृती गंभीर झाल्याने त्याला मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले आहे.