संघाच्या पथ संचलनावर फुलांचा वर्षाव करणं मुस्लीम डॉक्टरला पडलं भारी; फतवा जारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 08:35 PM2022-04-05T20:35:19+5:302022-04-05T20:36:05+5:30
मोहम्मद निजाम भारती असे या डॉक्टरचे नाव आहे. यांच्याविरोधात फतवा जारी करून, त्यांच्यावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा आदेश देण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) पथसंचलनावर फुलांचा वर्षाव करणे एका मुस्लीमडॉक्टरला भारी पडले आहे. मोहम्मद निजाम भारती असे या डॉक्टरचे नाव आहे. यांच्याविरोधात फतवा जारी करून, त्यांच्यावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा आदेश देण्यात आला आहे. एवढेच नाही तर, त्यांना मारल्यानंतर एक लाख रुपयांच्या बक्षीसासंदर्भातही बोलण्यात आले आहे.
मैनाठेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महमूदपूर माफी येथील रहिवासी डॉ. मोहम्मद निजाम भारती (Mohammad Nizam Bharti) यांनी पोलिसांत तक्रार केली आहे की, नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन काढण्यात आले होते. यावर आम्ही फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले होते. यामुळे इम्रानने आपल्या विरोधात फतवा जारी करत, मुस्लीम समाजातून आमचा सामूहिक बहिष्कार केला आहे.
डॉ. मोहम्मद निजाम म्हणाले, ठिकठिकाणी पॅम्प्लेट्स वाटून लोकांना आमच्यासोबत संबंध ठेवू नका, असे सांगण्यात आले आहे. तसेच मला मारून गावातून हाकलून देण्यासाठी बक्षीसही ठेवण्यात आले होते. फतवा काढल्यापासून मुस्लीम समाजातील लोक माझ्यापासून दूर होऊ लागले आहेत. याचा माझ्या कामालाही फटका बसला आहे.
डॉ. मोहम्मद निजाम भारती यांनी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. मात्र, काही गावकऱ्यांमध्ये हे प्रकरण आयपीएल बेटिंगशी संबंधित असल्याची आणि आयपीएल सट्ट्यासंदर्भात दोन्ही बाजूंच्या लोकांत वाद झाल्याचीही चर्चा आहे.
या प्रकरणी एसएसपी बबलू कुमार म्हणाले, 'मेहमूदपूर माफी गावातील डॉक्टर निजामच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सांगण्यात आले आहे, की इम्रान वारसीने त्याच्याविरोधात फतवा काढला आहे आणि त्या आधारे इम्रानला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे.'