घराबाहेर काढलेल्या पत्नीच्या डोक्यात घातला दगड, पत्नी गंभीर; पतीविरुद्ध गुन्हा
By मनोज शेलार | Published: April 1, 2023 06:48 PM2023-04-01T18:48:50+5:302023-04-01T18:48:59+5:30
मोख येथील किसन हांद्या पाडवी (वय ४६) याचे त्याची पत्नी हुनारीबाई पाडवी (४५) हिच्याशी घरगुती वादातून भांडण झाले होते.
मनोज शेलार/नंदुरबार
नंदुरबार : पत्नीला घराबाहेर काढलेले असताना ती परत गावात आली. त्यामुळे संतापलेल्या पतीने तिला पाहताच तिच्या डोक्यात दगड घातल्याची घटना मोख बुद्रुकचा पाटीलपाडा येथे घडली. याबाबत धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, मोख येथील किसन हांद्या पाडवी (वय ४६) याचे त्याची पत्नी हुनारीबाई पाडवी (४५) हिच्याशी घरगुती वादातून भांडण झाले होते. काही दिवसांपूर्वी तिला घरातून बाहेर काढले होते. पुन्हा घरी व गावात यायचे नाही म्हणून तिला बजावले होते; परंतु ३० मार्च रोजी हुनारीबाई गावात आल्याचे किसन याला कळताच त्याचा राग अनावर झाला. त्याने गावात हुनारीबाई हिला शोधून काढले व गावात का आली म्हणून जाब विचारला. रागाच्या भरातच त्याने दगड उचलून तिच्या डोक्यात घातला. त्यात ती जखमी झाली. याबाबत हुनारीबाई पाडवी यांनी फिर्याद दिल्याने किसन हांद्या पाडवी याच्याविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस कर्मचारी दीपक वारुळे करीत आहेत.