सीबीआयच्या नावानं तरुणाला घातला गंडा; एका कॉलनं ९.५० लाखाला लागला चुना
By गौरी टेंबकर | Published: May 17, 2024 03:47 PM2024-05-17T15:47:06+5:302024-05-17T15:50:49+5:30
सीबीआयचे नाव घेत ९.५० लाखांचा गंडा
मुंबई: तुझ्यावर केस दाखल झाली असून लिगल व्हेरिफिकेशनसाठी सीबीआयच्या बँक खात्यात पैसे पाठवायला सांगत विद्यार्थ्याला लाखोंचा चुना लावण्यात आला. हा प्रकार बोरिवली पोलिसांच्या हद्दीत घडल्यानंतर याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार तन्मय परुळेकर (२६) हा विद्यार्थी बोरिवलीच्या वजीरा नाका परिसरात राहतो. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १५ मे रोजी त्याला एका अनोळखी मोबाईलवरून रेकॉर्डेड कॉल आला. त्यामध्ये त्याला दिल्ली हायकोर्ट येथून समन्स बजावण्यात आल्याचे म्हणत अधिक माहितीसाठी शून्य डायल करायला सांगितला. तन्मयने शून्य डायल केल्यावर संजय शर्मा नामक व्यक्तीने तो उचलत लजपत नगर येथे आयसीआयसीआय बँकेत त्याच्या नावावर एक खाते उघडण्यात आले असून त्यातून २५ लाखांचे बेकायदेशीर ट्रांजेक्शन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच त्याच्यावर केसही दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी सायबर अधिकारी पुढील चौकशी करतील असे म्हणत दुसऱ्या व्यक्तीला फोन दिला. त्या दुसऱ्या व्यक्तीने तन्मयचे नाव, त्याच्या बँकेची तसेच त्यातील सेव्हींगची सर्व माहिती घेतली. एक वर्षाचे बँक स्टेटमेंट काढून मागत त्यानंतर त्याच्या नावे २५ बनावट फेक अकाउंट उघडण्यात आले असून त्यामुळे त्याच्या खात्यातील रकमेचे लीगल वेरिफिकेशन करावे लागणार असल्याचे म्हणाला. त्यानंतर सायबर अधिकारी म्हणणाऱ्या व्यक्तीने एक बँक खात्याचा नंबर देत ते सीबीआयचे खाते असून रकमेच्या वेरिफिकेशनसाठी खात्यात असलेली १५ लाखांची रक्कम पाठवायला सांगितली. घाबरलेल्या तन्मयने जवळपास ९.५० लाख रुपये भामट्यांना पाठवले मात्र नंतर त्याला संशय आल्याने गुगलवर सर्च केले. तेव्हा अशाच कार्य पद्धतीने अनेकांची फसवणूक करण्यात आल्याचे त्याला दिसले. फोन कट करत त्यांने मदतीसाठी सायबर पोलिसांच्या १९३० या क्रमांकावर संपर्क करत तक्रार देऊन पोलीस ठाणे गाठले.