बलात्कारातील आरोपी मास्तरने स्वत:चीच चिता रचली; फोटोशूट करून न्यायालयातून सुटला, पुढे अडकला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 01:27 PM2022-10-20T13:27:54+5:302022-10-20T13:29:04+5:30
बलात्काराचा आरोप असलेल्या बिहारमधील एका शिक्षकाने स्वतःच्या मृत्यूची खोटी कहाणी रचली.
भागलपुर : बिहारच्या भागलपूरमध्ये बलात्काराचा आरोप असलेल्या शिक्षकाने स्वतःच्या मृत्यूची खोटी कहाणी रचली. त्याच्या वडिलांनीही या कटात त्याला साथ दिली. मात्र, याचा खुलासा होताच आरोपीने सोमवारी नाट्यमय पद्धतीने लपूनछपून न्यायालयात जाऊन आत्मसमर्पण केले.
सदर घटना जिल्ह्यातील मधुरा सिमानपूर गावातील आहे. येथील शिक्षक नीरज मोदी याच्यावर विद्यार्थिनीने १४ ऑक्टोबर २०१८ रोजी बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात शिक्षा होणार होती, त्याचवेळी आरोपी आणि त्याचे वडील राजाराम मोदी यांनी मिळून एक कट रचला.
पीडितेच्या आईने उघडकीस आणला कट-
हा कट बलात्कार पीडितेच्या आईनेच उघडकीस आणला. मृत्यूचे नाटक केल्याची खात्री झाल्यावर त्यांनी गटविकास अधिकायांना अर्ज दिला. यामध्ये बनावट मृत्यू प्रमाणपत्र जारी झाल्याची माहिती देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची" विनंती केली होती. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा तपास सुरु केला आणि सत्य बाहेर आले.
२१ मे २०२२ रोजी गटविकास अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, आरोपी नीरज मोदीचे वडील राजाराम मोदी यांच्यावर फसवणुकीसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या फसवणूक प्रकरणात लगेचच राजारामला अटक झाली व नीरजचे मृत्यू प्रमाणपत्रही रद्द करण्यात आले. वडील तुरुंगात गेल्यानंतर आरोपी नीरजला फार काळ भूमिगत होता आले नाही.
असे मिळवले मृत्यू प्रमाणपत्र-
१. शिक्षा टाळण्यासाठी आरोपीने त्याच्या मृत्यूची खोटी कहाणी रचली. वडिलांनी मुलाची चिता सजवली. पोलीस आणि न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी मुलाला चितेवर डोळे बंद करून झोपवले आणि फोटोग्राफीही करून घेतली.
२. यानंतर ती छायाचित्रे विशेष पोक्सो न्यायालयात सादर करण्यात आली. कहलगाव स्मशानभूमीतून लाकडे खरेदी केल्याची पावतीही त्यांनी मिळवली. नंतर मुलाचे मृत्यू प्रमाणपत्र बनवून न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. यानंतर पोलिसांनीही त्याचा मृत्यू सत्य मानून प्रकरण थंडबस्त्यात टाकले. कोर्टात फाइल बंद करण्यात आली आणि पिता-पुत्र लगेचच भूमिगत झाले.