प्लॉटच्या व्यवहारातील पैसे मागितल्याने शिक्षकावर कोयत्याने वार
By रूपेश हेळवे | Published: September 14, 2023 07:16 PM2023-09-14T19:16:30+5:302023-09-14T19:17:28+5:30
फिर्यादी रावसाहेब सावंत व नवनाथ खटके यांच्यात तीन वर्षांपूर्वी जागेचा व्यवहार झाला होता
रुपेश हेळवे
सोलापूर : प्लॉटच्या व्यवहारातील पैसे परत देतो म्हणून बोलावून तिघांनी मिळून तुझे काही एक पैसे देणे लागत नाही, म्हणत कोयत्याने शिक्षकाच्या कपाळावर मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवार, ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी सांगोल्यातील मेरी गोल्ड शाळेसमोर घडली. याबाबत रावसाहेब तुकाराम सावंत (रा. दत्तनगर, सांगोला) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी नवनाथ खटके, पांडुरंग खटके, भगवान खटके (सर्व रा. वासुद, ता. सांगोला) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी रावसाहेब सावंत व नवनाथ खटके यांच्यात तीन वर्षांपूर्वी जागेचा व्यवहार झाला होता. त्या व्यवहारातील काही रक्कम नवनाथकडुन फिर्यादीस येणे बाकी होती. तेव्हा फिर्यादीने तुमच्याकडे पैसे येणे आहेत. आपण हिशोब करू आणि तुम्ही पैसे द्या, असे म्हणाला. त्यावेळी नवनाथ व भगवान खटके हे रावसाहेब सावंत यांना मारहाण करू लागले. त्यावेळी रावसाहेब यांचा मुलगा सात्विक भांडण सोडविण्यासाठी आला असता, त्यालाही मारहाण करू लागले. दरम्यान, कोयत्याने रावसाहेब सावंत यांच्या कपाळावर मारून त्यांना जखमी केले. अशा आशयाची फिर्याद सावंत यांनी दिली आहे.