विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By सूरज.नाईकपवार | Published: August 31, 2023 12:52 PM2023-08-31T12:52:41+5:302023-08-31T12:55:55+5:30
शाळेतील पीटी शिक्षकाने केले दुष्कृत्य, पुढील तपास सुरु
सूरज नाईक पवार / मडगाव: गोव्यातील दक्षिण गोव्यात एका पीटी शिक्षकानेच एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणात पीटी शिक्षकाला पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. रमेश सोनू गांवकर असे संशयिताचे नाव आहे.
गोव्यतील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका सरकारी हायस्कुलमध्ये शिक्षक कामाला होता. शिक्षकदिन जवळ येऊन पोहचला असतानाच, शिक्षकी पेशाला काळीमा लावणारी ही घटना घडल्याने याबाबत अधिकच हळहळ व्यक्त होत आहे. संशयिताविरोधात कुंकळ्ळी पोलिसांनी भादंसंच्या ३५४ (अ) व ५०९, गोवा बाल कायदा कलम ८, बाल सरंक्षण कायदा व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६३, ६७ (अ) अंतर्गंत गुन्हा नोंद केला आहे. बुधवारी रात्री त्याला पोलिसांनी अटक केली.
पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण पुढील तपास करीत आहेत. विनयभंगाची वरील घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. रमेश हा पीटी शिक्षक आहे. एका विदयार्थीनीचा त्याने हात पकडला होता. तसेच ती दोरीउडीचा सराव करताना तो तिला नेहमी न्याहाळात होता. तिला आपल्या मोबाईलवरुन त्याने पोर्नोग्राफी व्हिडीओही पाठविले होते. त्या मुलीने पालकांना ही बाब सांगितल्यानंतर हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला होता. बुधवारी या संबधी कुंकळ्ळी पोलिसांत त्या हायस्कुलच्या मुख्याध्यीपिकेने तक्रार नोंदविली. पोलिसांनी लागलीच या प्रकरणाचा तपास करुन संंशयिताला गजाआड केले.