थरारक पाठलाग करून आवळल्या चोराच्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2023 10:03 AM2023-03-01T10:03:01+5:302023-03-01T10:03:19+5:30
१० गुन्ह्यांची उकल, तब्बल १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : घरफोडीच्या गुन्ह्यांमधील सराईत चोरटा शंकर भीमराव सूर्यवंशी ऊर्फ धोत्रे ऊर्फ चेनाळे (२६) याला मानपाडा पोलिसांनी गजाआड केले. वझे कंपाऊंड परिसरात भर दुपारी घरफोडी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली; मात्र पोलिस आल्याची चाहूल लागताच निसटलेल्या या चोरट्याचा अर्धा तास पाठलाग करून त्याला जेरबंद करण्यात आले. अर्धा ते पाऊणतास हा थरार सुरू होता. चौकशीत मानपाडा, रामनगर, विष्णूनगर पोलिस ठाण्यातील एकूण १० गुन्ह्यांची उकल झाली.
जानेवारीपासूनच घरफोड्यांचे सत्र सुरू आहे. बहुतांश घटना मध्यरात्रीसह दिवसाढवळ्याही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील चारही पोलिस ठाण्यांतर्गत तपासासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. त्याप्रमाणे मानपाडा पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या अधिपत्याखाली सहायक पोलिस निरीक्षक अविनाश वनवे, सुनील तारमळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक भानुसाद काटकर, पोलिस हवालदार राजेंद्र खिल्लारे, दीपक गडगे, सोमनाथ टिकेकर, सुनील पवार, गिरीश पाटील, विकास माळी, संजय मासाळ, पोलिस नाईक गणेश भोईर, प्रवीण किनरे, महादेव पवार, यल्लप्पा पाटील, पोलिस शिपाई महेंद्र मंझा, संदीप चौधरी, अशोक आहेर, विजय आव्हाड यांची विशेष पथके नेमण्यात आली आहेत.
असा केला पाठलाग
घरफोडीची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी वनवे व तारमळे यांची पथके रवाना झाली. पोलिस आल्याची चाहूल लागताच चोरट्याने पळ काढला आणि एमआयडीसीतील कंपन्यांच्या परिसरातून बचावासाठी धावू लागला, मात्र पथकाने त्याला पाठलाग करून पकडले. शंकर मूळचा कर्नाटकचा आहे. त्याचा आणखीन एक साथीदार असून त्याचा शोध सुरू आहे