एक हजाराचे शूज पडले १.१९ लाखात; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 06:07 PM2022-10-14T18:07:22+5:302022-10-14T18:08:20+5:30
१३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.२३ वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी दत्तापूर पोलिसांनी एका मोबाइलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अमरावती : धामणगाव येथील एका शिक्षकाला ऑनलाइन मागविलेले हजार-बाराशे रुपयांचे शूज तब्बल १ लाख १९ हजार ४४५ रुपयांमध्ये पडले. रिफंड मिळविण्यासाठी एनी डेस्क हा ॲप डाऊनलोड करताच, त्या शिक्षकासह त्यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यातून ती रक्कम ऑनलाइन वळती झाली.
१३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.२३ वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी दत्तापूर पोलिसांनी एका मोबाइलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जुना धामणगावातील एका शिक्षकाने एका ई-कॉमर्स वेबसाइटवरून शूज ऑर्डर केले. ९ ऑक्टोबर रोजी ते आले. मात्र, शूज लहान झाल्याने ते त्यांनी परत केले. मात्र, ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही.
दरम्यान, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी शिक्षकाला एक कॉल आला. आपण संबंधित कंपनीचा मॅनेजर बोलत असून, तुमची रक्कम परत करतो. मात्र, त्यासाठी एनी डेस्क ॲप डाऊनलोड करण्यास सुचविले. तो ॲप डाऊनलोड केल्याबरोबर त्या शिक्षक दाम्पत्याच्या खात्यातून १.१९ लाख रुपये वळती झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी दुपारी दत्तापूर पोलीस ठाणे गाठले.
क्रेडिट कार्डच्या लिमिटच्या नावावर फसवणूक
क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देण्याची बतावणी करून, एका २६ वर्षीय तरुणाची ५० हजार ५९० रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ७ ऑक्टोबर रोजी वरुड येथील ब्राह्मणपुरी भागातील रहिवासी असलेल्या तरुणासोबत ही घटना घडली. लिमिट वाढवून देतो, म्हणत तरुणाच्या मोबाइलवर एक कोड देण्यात आला. तो आरोपी कॉलरला सांगताच, त्यांच्या खात्यातून दोन दिवसांनी ५० हजार ५९० रुपये परस्पर कपात झाले.