उल्हासनगरात व्यापाऱ्याला ३५ लाखाचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 17:52 IST2022-01-30T17:52:16+5:302022-01-30T17:52:47+5:30
पोलिसांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

उल्हासनगरात व्यापाऱ्याला ३५ लाखाचा गंडा
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-१ सोनार गल्लीत सोन्याचे दुकान असलेले सुमित घोष यांनी पुणे येथील ज्वलर्स दुकानदाराला सोन्याचे दागिने बनवून दिले. मात्र सोन्याच्या दागिन्यांचे तब्बल ३५ लाख रुपये जून २०१६ साल पासून दिले नसल्याने, अखेर त्यांच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर मध्ये राहणारे सुमित घोष हे सोन्याचे दागिने बनविणारे कारागीर असून त्यांचे सोनार गल्लीत ज्वलर्सचे दुकान आहे. जून २०१६ मध्ये त्यांनी ओळखीचे असलेले पुणे येथील मेघानी ज्वलर्स दुकानाचे मालक प्रकाश वेदसा व प्रवीण वेदसा यांच्याकडून सोन्याचे दागिने बनवून देण्याची ऑर्डर घेतली. एक किलो ३४२ ग्रॅमचे तब्बल ३४ लाख किमतीचे सोन्याचे दागिने ऑर्डरप्रमाणे बनवून दिले. त्यानंतर सोन्याच्या दागिन्यांचे ३४ लाख व सोन्याचे दागिने बनविण्या साठी लागणारी १ लाखाची मजुरी असे एकून ३५ लाखाची मागणी केली. मात्र व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी उल्हासनगर पोलिसात धाव घेऊन झालेला प्रकार कथन केला. पोलिसांनी प्रकाश व प्रवीण वेदसा यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.