पोलिसांनी वेशांतर करून रचला सापळा; ५० लाखाच्या खंडणीसाठी व्यापा-याचे अपहरण करणा-या चौघांना फिल्मी स्टाईलने अटक
By प्रशांत माने | Published: August 5, 2022 10:08 PM2022-08-05T22:08:32+5:302022-08-05T22:08:55+5:30
Crime News : संजय विश्वकर्मा, संदीप रोकडे, धर्मदाज कांबळे, रोशन सावंत सर्व रा. डोंबिवली अशी अटक आरोपींची नावे आहेत.
डोंबिवली: हिम्मत नाहर या प्लायवुड व्यापा-याचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी ५० लाख रूपयांची खंडणी मागणा-या पाच पैकी चौघांना शहापूर गोठेघर गावाच्या परिसरातून येथून मानपाडा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आठ तासात अटक केली. नाहर यांची सुखरूप सुटका करण्यात आली असून ही कामगिरी बजावताना पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांनी गावातील लोकांप्रमाणे कपडयांचा पेहराव करून वेशांतर केले होते.
संजय विश्वकर्मा, संदीप रोकडे, धर्मदाज कांबळे, रोशन सावंत सर्व रा. डोंबिवली अशी अटक आरोपींची नावे आहेत. डोंबिवली पूर्व भागात हिम्मत नाहर यांचे डिलक्स प्लायवूड हे दुकान आहे. ३ ऑगस्ट रोजी संजय विश्वकर्मा नावाचा त्यांच्या ओळखीचा व्यक्ती तेथे आला. त्याने प्लायवूड संदर्भात काही व्यवहार केले. अॅडव्हान्सचे पैसे एटीएममधून काढून देतो असे सांगून दुकानापासून काही अंतरावर नाहर यांना घेऊन गेला. तेथून नाहर यांना यांना एका गाडीत कोंबले आणि त्यांचे अपहरण केले. रात्री साडेनऊ वाजता नाहर यांचा पुतण्या जितू यांना मोबाईलवर फोन आला. फोन करणा-या व्यक्तीने तुमचा काका आमच्या ताब्यात आहे तो परत पाहिजे असेल तर ५० लाख रूपये तयार ठेवा आम्ही एका तासात पैसे कुठे जमा करायचे याबाबत कळवितो.
जितू यांनी तत्काळ मानपाडा पोलिस ठाणो गाठले आणि तक्रार दिली. गुन्हयाचे स्वरूप लक्षात घेता पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त. सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांनी तपासासाठी सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल तारमळे आणि अविनाश वनवे, पोलीस हवालदार राजेंद्र खिल्लारे, विजय कोळी, निसार पिंजारी, पोलीस नाईक प्रविण किनरे, दिपक गडगे, यल्लपा पाटील, देवा पवार, प्रशांत वानखेडे, सुशांत तांबे, अशोक कोकोडे, पोलीस शिपाई ताराचंद सोनावणे, महेंद्र मंजा, संतोष वायकर यांची विशेष पथके नेमली. जितू यांना मुंबई आग्रा रोडवरील शहापूर गोठेघर गावाजवळील एका बोगद्याच्या ठिकाणी पैसे घेऊन येण्यास सांगितले होते. जितू हे पैसे घेऊन गेले. पोलिसांची पथके गावक-यांच्या वेशात गोठेघर परिसरात आधीच दबा धरुन बसली होती. थोडय़ाच वेळात त्याठिकाणी एक झायलो कार त्याठिकाणी आली. त्यात तीन व्यक्ती होते. जितू याने आधी काकांना मला माङया ताब्यात द्या असे सांगितले. तुमच्या काकाला जवळच असलेल्या खोलीत ठेवल्याची माहीती त्यांनी दिली. त्याचवेळी पोलिसांनी स्वत:च्या गाडया आडव्या टाकून झायलो कारला घेरले आणि तिघांना अटक केली. संबंधित आरोपींना घेऊन घराची पाहणी केली असता त्याठिकाणी आणखीन एक आरोपी आढळुन आला तर अन्य एक आरोपी इक्बाल शेख अंधाराचा फायदा उठवित पळून गेला. अपरहण केलेल्या नाहार यांना एका खोलीत एका पलंगाला दोरीने बांधून ठेवले होते.
गुन्हयातील कार घेतली होती भाडयाने
गुन्हयात वापरलेली झायलो कार ही शिर्डी येथे जायचे आहे हे सांगून एका ट्रॅव्हल्स कंपनीकडून भाडयाने घेतली होती. अटक आरोपींपैकी संदीप रोकडे याने ती घेतली होती. ही कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
आरोपी सुशिक्षित बेरोजगार
आरोपी सुशिक्षित बरोजगार असून त्यांनी झटपट पैसे कमविण्यासाठी हा गुन्हा केल्याचे तपासात समोर आले आहे. संबंधित व्यापा-याची सर्व माहीती काढून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा आरोपींचा डाव होता अशी माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली.