ज्वेलर्स दुकानात दागिने चोरणाऱ्या त्रिकूटाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 04:02 PM2024-05-30T16:02:39+5:302024-05-30T16:03:12+5:30
श्रीप्रस्थाच्या सुबोध सागर बिल्डिंगमध्ये असलेल्या नाकोडा ज्वेलर्स या सोन्याचांदीच्या दुकानात १५ मे रोजी रात्री लाखोंची घरफोडी झाली होती.
मंगेश कराळे
नालासोपारा :- ज्वेलर्स दुकानात लाखोंच्या सोने चांदीच्या दागिन्यांची घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. या त्रिकूटाकडून पोलिसांनी दोन गुन्ह्यांची उकल करून गुन्ह्यासाठी वापरलेली कार आणि घरफोडीचे साहित्य असा एकूण ५ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी गुरुवारी दिली आहे.
श्रीप्रस्थाच्या सुबोध सागर बिल्डिंगमध्ये असलेल्या नाकोडा ज्वेलर्स या सोन्याचांदीच्या दुकानात १५ मे रोजी रात्री लाखोंची घरफोडी झाली होती. चोरट्यांनी दुकानाच्या शटरची लोखंडी पट्टी तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्याचे ६० पॅन्डल, ३६ अंगठ्या, १२ नथ, २४ कानातील भाळ्या, ३६ कानातील टॉप, ५० ग्रॅमच्या सोन्याच्या चेन, १५० चांदीचे शिक्के, चांदीच्या मूर्ती, बिछिया, पैंजण, नोज पिन, जुनी चांदीची भांडी आणि रोख रक्कम असा १५ लाख २७ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. दुकान मालक शांतीलाल सुराणा (४३) यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिन्यापासुन घरफोडीच्या गुन्हयात वाढ झाल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेऊन आरोपींचा शोध घेवुन पायबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी गुन्हयाचा समांतर तपासादरम्यान घटनास्थळावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयीत आरोपी निष्पन्न केले. तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या बातमीवरून आरोपी मोहम्मद शाहिद खान (४४), शंकर गौडा (४९), शमशुद कुरेशी (३३) या तिघांना बुधवारी ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली बोलेरो कार व घरफोडीचे साहीत्य असा ५ लाख ४२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीकडून दोन गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या बोलेरो कारला विविध बनावट नंबर प्लेट लावून अशाच प्रकारे मुंबई, भिवंडी, डोंबिवली परिसरात आणखी घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. ताब्यात घेण्यात आलेला आरोपी शंकर गौडा याच्यावर घरफोडी, दरोडयासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोउपनिरी उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, आश्विन पाटील, राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, आतिश पवार, मनोज तारडे, तुषार दळवी, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे आणि सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे.