बालसुधारगृहातून पळालेल्या विधीसंघर्षग्रस्तांचा धूमाकुळ; पोलिस शिपायाला केले जखमी
By दयानंद पाईकराव | Published: December 27, 2023 11:45 PM2023-12-27T23:45:00+5:302023-12-27T23:45:14+5:30
ऑटोचालकाला लुटले, गोंदियात पोलिस व्हॅनची तोडफोड
नागपूर : पाटनकर चौकातील बालसुधारगृहातून पळून गेलेल्या ६ विधीसंघर्षग्रस्त बालकांनी मागील तीन दिवसांपासून नागपूर आणि गोंदियात धुमाकुळ घातला आहे. त्यांनी गोंदिया आणि नागपुरात पोलिसांवरच हल्ला चढविला. बुधवारी रात्री त्यांनी केलेल्या हल्ल्यात सिताबर्डी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई सुशांत वाडिया जखमी झाला. दरम्यान यातील एका विधीसंघर्षग्रस्त बालकास सीताबर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर फरार आहेत.
रविवारी २४ डिसेंबरला सकाळी पाटनकर चौकातील बालसुधारगृहातून सहा विधीसंघर्षग्रस्त बालक सुरक्षा रक्षकावर हल्ला करून फरार झाले होते. पोलिसांनी शोध घेऊनही त्यांचा सुगावा लागला नाही. बालसुधारगृहातून पळून गेल्यानंतर २४ डिसेंबरला सायंकाळी सात वाजता त्यातील चार जण विद्यापीठ लायब्ररी चौकातून अंबाझरी मेट्रो स्टेशनला जाण्यासाठी भीमराव काशीनाथ वाढवे (वय ५५, रा. पन्नासे ले आऊट स्वावलंबीनगर) यांच्या आॅटोत बसले. परंतु बजाजनगरच्या कब कॅफेसमोर त्यांनी आॅटो थांबवून आॅटोचालकाला मारहाण करीत त्याच्याकडील रक्कम लुटून आॅटो घेऊन पळ काढला होता. त्यानंतर ते २५ डिसेंबरला गोंदियाला गेले. २६ डिसेंबरला ते गोंदियात आॅटोने फिरत असताना त्यांचा आॅटो उलटला. घटनास्थळी पोलिसांना कारवाई करताना पाहून त्यांनी पोलिसांवर हल्ला चढवून पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली. तेथून बुधवारी सकाळी ते रेल्वेने नागपुरात आले. त्यानंतर तीन-तीनच्या गटात वेगळे होऊन शहरात फिरत होते. त्यातील तीघे रात्री ८ वाजता सिताबर्डी परिसरात आले.
इटर्निटी मॉलच्या मागील मार्गावर त्यांनी एका तृतीयपंथीयाला जखमी करून लुटले. तृतीयपंथीयाची अॅक्टीव्हा गाडी घेऊन ते फरार झाले. यावेळी परिसरात गस्त घालत असलेले सिताबर्डी ठाण्याचे विनोद तिवारी आपल्या सहकाºयांसोबत तेथून जात असताना तृतीयपंथीयाने घटनेची माहिती पोलिसांना दिली. तिवारी आणि त्यांचे सहकारी त्वरीत विधीसंघर्षगस्त बालक गेलेल्या दिशेने गेले असता मुंजे चौकात विधीसंघर्षग्रस्त बालक आढळले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी चाकु काढून पोलिसांवर हल्ला केला. यात सुशांत वाडिया या पोलिसाला त्यांनी जखमी केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. त्यातील एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला सीताबर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले असून अद्यापही पाच जण फरार आहेत.