शॉकींग! विधवा महिलेच्या डोळ्यात मिरची टाकून विवस्त्र करीत मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 05:50 AM2022-09-22T05:50:42+5:302022-09-22T05:51:11+5:30
मुखेड शहराजवळील हुलगुडवाडी येथील खळबळजननक घटना, ५ जणांविरुद्ध गुन्हा
मुखेड (जि. नांदेड) तालुक्यातील शिरूर द.ये. येथील एक ३२ वर्षीय विधवा महिला आपल्या माहेरी हुलगडवाडी येथे पित्राच्या जेवणाच्या कार्यक्रमास आली असता हुलगुडवाडी येथील पाच जणांनी अनैतिक संबंधाचा राग धरून या महिलेच्या डोळ्यांत, तसेच अंगावर मिरची टाकून विवस्त्र करीत मारहाण केली.
याप्रकरणी मुखेड पोलिसांत २१ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, तालुक्यातील शिरूर दबडे येथील ही महिला माहेरी हुलगुडवाडी येथे आली असता १७ रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान तिच्या वडिलांच्या घरात घुसून तिला या आरोपींनी जाब विचारला. तू आमच्या नातेवाईक तरुणीचा संसार खराब करते आहेस म्हणून मारहाण करून तिला घरातून ओढत रस्त्यावर आणले व तिच्या अंगावर व डोळ्यात मिरची पावडर टाकून जातिवाचक शिवीगाळ करून विवस्त्रही केले.
ही घटना मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनीच घडली. पीडित महिलेवर १७ तारखेपासून २० सप्टेंबरदरम्यान दवाखान्यात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा होतच मुखेड पोलीस स्टेशन येथे येऊन दि.२१ रोजी तिने तक्रार दिली. यावरून आरोपींविरुद्ध विविध कलमांसह अनु. जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पाचही आरोपी झाले पसार
मारोती खांडेकर, परमेश्वर खांडेकर, व्यंकट खांडेकर, नागेश खांडेकर, मसणाजी खांडेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, ते पसार झाले आहेत. पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.