धारावीतील महिलेने अल्पवयीन मुलाचे केले लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 07:31 PM2022-05-12T19:31:48+5:302022-05-12T19:32:21+5:30
Woman booked for sexually abusing minor boy : महिला आणि अल्पवयीन दोघांची सप्टेंबर 2020 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांची ओळख झाली आणि नंतर ते चॅटिंग करू लागले होते.
मुंबई : धारावीतील एका २० वर्षीय महिलेवर बिहारमधील एका १७ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महिलेने अल्पवयीन मुलगाआणि त्याचे वडील, चार काका आणि चुलत भावाविरुद्ध बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.
धारावी पोलीस सध्या दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत. असे सांगितले की, अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिला आणि अल्पवयीन दोघांची सप्टेंबर 2020 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांची ओळख झाली आणि नंतर ते चॅटिंग करू लागले होते. महिलेने त्या मुलाला अनेक वेळा प्रपोज केले, पण मुलाने तिला नकार दिला आणि तिला ब्लॉकही केले. तिने नंतर वेगवेगळी नावे वापरून इतर प्रोफाईल उघडले आणि त्याच्याशी संपर्क साधला.
त्यानंतर हा मुलगा १९ जानेवारीला नोकरीच्या शोधात मुंबईत त्याच्या नातेवाईकाच्या घरी आला. ही बाब महिलेला समजल्यानंतर तिने त्याला तिच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी धारावी येथील तिच्या घरी बोलावले. पण जेव्हा मुलगा आला तेव्हा तेथे कोणीही नव्हते आणि महिलेने त्याच्यासोबत जबरदस्ती केली.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “त्यानंतर मुलीने मुलाला जे काही करायचे आहे ते करण्यास सांगितले, तसे न केल्यास तिने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तिने मुलाला वाशीतील एका लॉजसह अनेक ठिकाणी बोलावून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. अखेर या अल्पवयीन मुलाने आपल्या आई-वडिलांना हा त्रास सांगितला, त्यानंतर ते मुंबईत आले आणि महिलेला दूर राहण्यास सांगितले.
“त्यानंतर महिलेने तिचे घर सोडले आणि एका मित्रासोबत राहू लागली. गेल्या महिन्यात, तिने नवी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली, की मुलगा, त्याचे वडील, त्याचे चार काका आणि चुलत भावाने तिच्यावर बलात्कार केला. नवी मुंबई पोलिसांनी हे प्रकरण धारावी पोलिसांकडे हस्तांतरित केले, असं अधिकाऱ्याने सांगितले. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. त्यानंतर त्यांनी धारावी पोलिसांशी संपर्क साधला आणि महिलेने त्यांच्या मुलावर अत्याचार केल्याचा आरोप केला आणि त्यानुसार पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.