"पती, दिराला कायमचा संपवला, मृतदेह उचला.."; बंदूक घेऊन महिला आली पोलिसांना शरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 11:44 AM2024-01-02T11:44:54+5:302024-01-02T11:45:17+5:30
ही घटना उज्जैनच्या जिल्हा मुख्यालयापासून २५ किमी अंतरावरील इंगोरिया गावात घडली. मृ
मध्य प्रदेशातील उज्जैन इथं प्रॉपर्टीच्या वादातून एका महिलेने पती आणि दिराची गोळी मारून हत्या केली. त्यानंतर आरोपी महिलेने पिस्तुलासह पोलीस स्टेशन गाठत आत्मसर्मपण केले. पती आणि दिराला संपवलं, मृतदेह उचला असं म्हणत आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले. हातात पिस्तुल पकडत महिलेने तिचा गुन्हा पोलिसांसमोर कबुल केला त्यावेळी समोरील खुर्चीत बसलेले पोलीस ताडकन् उभे राहिले.
ही घटना उज्जैनच्या जिल्हा मुख्यालयापासून २५ किमी अंतरावरील इंगोरिया गावात घडली. मृतकाची ओळख आरोपी सविताचा पती राधेश्याम आणि दीर दिनेश नावानं झाली. इंगोरिया पोलीस अधिकारी चंद्रिका सिंह यांनी सांगितले की, राधेश्याम यांचा मृत्यू घटनास्थळीच झाला. तर दिनेश यांना गोळी लागल्यावर बडनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याठिकाणी उपचारावेळी दिनेश यांनी प्राण सोडले. त्यानंतर आरोपी महिला बंदुकीसह पोलिसांना शरण आली. सविता अंगणवाडी सेविका असून तिने पती आणि दिराला गोळी मारली. सुरुवातीच्या तपासात हे प्रकरण संपत्तीवरून झालेल्या वादातून घडले असं समोर आले आहे.
५ कोटी जमीन वाद
या प्रकरणी आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले की, फोरलेन हायवेवरील ५ कोटी किंमतीची जमीन दिराला हडपायची होती. माझा पती राधेश्याम व्यसन करायचा. दिराच्या सांगण्यावरून पती दररोज मला मारहाण करायचा. सोमवारी सकाळी पती शिवीगाळ करत होता. त्या रागात मी बेडखालची पिस्तुल काढली आणि आधी दिराला गोळ्या झाडल्या त्यानंतर पतीलाही मारून टाकले. रोजच्या मारहाणीमुळे आणि हिंसेमुळे हे पाऊल उचलल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्याशिवाय माझ्या २ मुली आणि एका मुलाच्या भविष्यासाठी मी या दोघांना मारले असंही महिला पोलिसांना म्हणाली.
बंदूक कुठून आणली?
अनेकांनी या हत्याकांडावर प्रश्न उभे केले. मृत व्यक्तीचे वडील आणि आरोपी महिलेच्या सासऱ्यांनी म्हटलं की, दिनेश आणि राधेश्याम या दोन्ही भावांमध्ये जमिनीचे वाटप आधीपासून होते मग वाद कशामुळे झाला? अखेर घरात बंदूक कुणी आणली? या सर्व गोष्टीची शहानिशा करून आरोपी सूनेला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली. तर घरगुती आणि संपत्तीच्या वादातून महिलेने रागाच्या भरात हे कृत्य केले. त्यानतर महिलेने पोलीस स्टेशनला येऊन शरणागती पत्करली. परंतु पोलीस या घटनेत आणखी तपास करत असून सर्व अँगलचा शोध घेत आहेत.