माता न तू वैरिणी..! क्लासमेटसोबत राहण्यासाठी आईनं पोटच्या ३ पोरांना संपवलं; पोलीस हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:02 IST2025-04-04T13:02:19+5:302025-04-04T13:02:43+5:30
पोलिसांनी या प्रकरणात जो खुलासा केला आहे तो ऐकून कुणीही हैराण होईल

माता न तू वैरिणी..! क्लासमेटसोबत राहण्यासाठी आईनं पोटच्या ३ पोरांना संपवलं; पोलीस हैराण
संगारेड्डी - उत्तर प्रदेशातील मेरठ इथं प्रियकरासोबत राहण्यासाठी पत्नीने पतीला मारल्याची घटना देशभरात चर्चेत आली. आता तेलंगणातील संगारेड्डी येथे याहून अधिक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. इथं घडलेल्या घटनेत एका महिलेने तिच्या पोटच्या ३ मुलांना मारून टाकले आहे. कधीकाळी क्लासमेट राहिलेल्या शिवासोबत राहता यावं म्हणून महिलेने हे कृत्य केले. हे दोघे नववी, दहावीत एकत्रित शिकायला होते आणि अलीकडेच दोघांची भेट झाली. या प्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय महिला रजिता आणि तिचा क्लासमेट प्रियकर शिवकुमारला अटक केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात जो खुलासा केला आहे तो ऐकून कुणीही हैराण होईल. शिवकुमार आणि रजिता काही महिन्यांपूर्वीच दहावीच्या रियूनियनमध्ये पुन्हा भेटले होते. रजिताचं २०१३ साली चेनैय्यासोबत लग्न झाले होते. रजिता आणि चेनैय्या या दोघांमध्ये २० वर्ष वयाचे अंतर होते. या दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायचे. त्यात ६ महिन्यापूर्वी दहावीतील बॅचमधील विद्यार्थ्यांचे रियूनियन झाले. त्यावेळी रजिता आणि शिवकुमार कित्येक वर्षांनी पहिल्यांदा भेटले. याच वेळी दोघांमधील जुन्या आठवणी ताज्या झाल्या. पुन्हा प्रेम उफाळून बाहेर आले. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी रजितानं तिच्या ३ निष्पाप मुलांचा बळी दिला आहे.
शिवानं ठेवली अट, त्यानंतर तयार झाला खतरनाक प्लॅन
शिवाने रजितासोबत राहण्यासाठी एक अट ठेवली होती ती म्हणजे तिने तिच्या मुलांपासून वेगळे व्हावे, त्यानंतरच लग्न करू. शिवाची अट पाहून रजिताने तिच्या मुलांचा काटा काढण्याची प्लॅनिंग केले. रजिताने ते शिवकुमारला सांगितले तो देखील त्यात सहभागी झाला. त्यानंतर रजिताने टॉवेलच्या मदतीने एका पाठोपाठ एक तिन्ही मुलांचा गळा दाबला. टँकर चालवणारा तिचा पती चेनैय्या जेव्हा घरी परतला तेव्हा तिने पोटात दुखत असल्याचा बहाणा केला. त्याशिवाय मुलेही दही भात खाऊन बेशुद्ध पडल्याचे सांगितले.
चेनैय्या आणि शेजाऱ्यांनी मिळून रजिता व तिन्ही मुलांना हॉस्पिटलला पोहचवले. जेव्हा हॉस्पिटल प्रशासनाला संशय आला त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर खाकीचा धाक दाखवताच रजिताने तिचा गुन्हा कबुल केला. या महिलेच्या मुलांचे वय १२, १० आणि ८ वर्ष होते. संगारेड्डी येथील हे प्रकरण आणि मेरठचं साहिल-मुस्कान कांड यात एक गोष्ट सारखीच आहे ती म्हणजे दोघांची ओळख शाळेच्या रियूनियनमध्ये झाली होती. दोन्ही प्रकरणात प्रेयसी आणि प्रियकर अनेक वर्षांनी भेटले आणि त्यांचे जुने प्रेम ताजे होऊन हत्येपर्यंत पोहचले.