डाकीण ठरवून त्रास दिल्याने महिलेचा गळफास, तीन जणांविरुद्ध गुन्हा
By मनोज शेलार | Published: July 3, 2024 05:44 PM2024-07-03T17:44:59+5:302024-07-03T17:45:07+5:30
याबाबत धडगाव पोलिसात कुटुंबातील तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार : डाकीण ठरवून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने कंटाळून ३१ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गोराडीचा पाटीलपाडा, ता. धडगाव येथे सोमवारी घडली. याबाबत धडगाव पोलिसात कुटुंबातील तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुथीबाई बिज्या वसावे (३१, रा. गोराडीचा पाटीलपाडा, ता. धडगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. बुथीबाई ही डाकीण असून तिने जादूटोणा करून घरातील गुरे-ढोरे मारली, असा संशय कुटुंबातील मंडळी घेत होते. त्या कारणावरून तिला नेहमीच मारहाण व शिवीगाळ केली जात होती. वारंवारच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून बुथीबाई हिने सोमवारी दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत डेबा ठोग्या वसावे, रा. अट्टी, ता. धडगाव यांनी फिर्याद दिल्याने बिज्या दोहण्या वसावे, दित्या दोहण्या वसावे, दोहण्या फुल्या वसावे (रा. गोराडीचा पाटीलपाडा, ता. धडगाव) यांच्याविरुद्ध धडगाव पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील करीत आहेत.