पर्स लांबविण्याच्या उद्देशाने महिलेस फरफटत नेले, सांगलीत घडला प्रकार

By शरद जाधव | Published: May 14, 2023 12:17 AM2023-05-14T00:17:01+5:302023-05-14T00:17:25+5:30

वर्दळीच्या रस्त्यावर थरार; तिघा संशयितांना जमावाकडून चोप

A woman was kidnapped with the intention of stealing her purse, an incident in Sangli | पर्स लांबविण्याच्या उद्देशाने महिलेस फरफटत नेले, सांगलीत घडला प्रकार

पर्स लांबविण्याच्या उद्देशाने महिलेस फरफटत नेले, सांगलीत घडला प्रकार

googlenewsNext

शरद जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: शहरातील कोल्हापूर रस्त्यावर महिलेकडील पर्स लांबविण्याच्या उद्देशाने हिसडा मारताना महिलेस फरफटत नेण्यात आल्याचा प्रकार घडला. समोर असलेल्या मोटारचालकाने प्रसंगावधान राखत दरवाजा उघडल्याने तिघे चोरटे खाली पडल्याने नागरिकांनी त्यांना पकडून चांगलाच चोप दिला. सुरज सत्ताप्पा भोसले (पिराईवाडी जि. कोल्हापूर), वैभव कृष्णात पाटील (केनवाडी जि. कोल्हापूर) आणि मुनीब मुस्ताक भाटकर ( रा. संजयनगर,सांगली ) अशी संशयितांची नावे आहेत.

शनिवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर हा प्रकार घडला. हरिपूर रोड परिसरात राहणाऱ्या साधना जयंत सातपुते या मुलीसह दुचाकीवरून जात होत्या. एसटी विभागीय कार्यालयाजवळ त्या आल्या असता, त्यांची दुचाकी पंक्चर झाली. त्यामुळे दोघीही दुचाकी चालवत जात होत्या. यावेळी संशयित तिघे कोल्हापूरच्या दिशेकडून आले. त्यांनी सातपुते यांच्याजवळ थांबत त्यांना काय झाले आहे असे विचारले. पंक्चर झाल्याचे सांगताच संशयितांनी त्यांना काही मदत करू का असे विचारले यावर सातपुते यांनी त्यांना नकार दिला. एवढ्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकाने सातपुते यांची पर्स हिसडा मारून ओढण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत सातपुते यांनी दुचाकी सोडून दिली पण पर्स सोडली नाही. त्यामुळे संशयितांनी त्यांना जवळपास दहा ते पंधरा फूट फरफटत नेले.

पाठीमागे चाललेला हा प्रकार पाहून समोर असलेल्या मोटारचालकाने मोटार बाजू घेतली एवढ्यात चालकाशेजारी बसलेल्याने दरवाजा उघडल्याने संशयितांची दुचाकी त्याला धडकून तिघेही खाली पडले. यानंतर आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी तिघांनाही पकडत चांगलाच चोप देण्यास सुरूवात केली. शनिवार सुटीचा दिवस असल्याने व सायंकाळची वेळ असल्याने रस्त्यावर चांगली वाहतूक असतानाही चोरट्यांनी असा प्रकार केल्याने नागरिकांनीही संताप व्यक्त केला. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

तिघेही गांजाच्या नशेत?

पोलिसांनी ताब्यात घेतलेले तिघांपैकी दोघे रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहेत. चेन स्नॅचिंगचे त्यांच्यावर गुन्हे आहेत. महिलेकडील पर्स लांबविताना नागरिकांचा चोप मिळालेले तिघेही नशेत होते. त्यामुळे त्यांना काहीही सांगता येत नव्हते. त्यांच्याकडील दुचाकीही चोरीची असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. महिलेकडील पर्स लांबविताना फरफटत नेण्यात येत असल्याचा व चोरटे खाली पडल्याचा थरार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.

Web Title: A woman was kidnapped with the intention of stealing her purse, an incident in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.