रुग्णवाहिकेत महिलेचा विनयभंग, विरोध करताच आजारी पतीला वाहनचालकाने बाहेर फेकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 05:21 PM2024-09-04T17:21:08+5:302024-09-04T17:21:59+5:30

या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून घटनेचा तपास सुरू आहे. 

A woman was molested in an ambulance in Uttar Pradesh, a case was registered in the police station | रुग्णवाहिकेत महिलेचा विनयभंग, विरोध करताच आजारी पतीला वाहनचालकाने बाहेर फेकलं

रुग्णवाहिकेत महिलेचा विनयभंग, विरोध करताच आजारी पतीला वाहनचालकाने बाहेर फेकलं

लखनौ - उत्तर प्रदेशच्या लखनौ येथे महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. रुग्णवाहिकेतच महिलेसोबत हा प्रकार घडला. त्यात रुग्णवाहिकेतील चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने महिलेच्या आजारी पतीला ऑक्सिजन हटवून बाहेर फेकले. या घटनेत पीडित महिलेच्या पतीचा उपचारावेळी मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

३० ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली. याबाबत पीडित महिलेने आरोप केला की, माझे पती हरिश यांची काही दिवसांपासून तब्येत बिघडली होती. त्यांना बस्तीच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी आणलं. तब्येत आणखी बिघडल्यानंतर त्यांना लखनौला नेण्यात आले मात्र तिथे हॉस्पिटलमध्ये जागा नसल्याने इंदिरा नगरच्या इंपीरिया न्यूरोसायन्स मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात पतीला दाखल केले असं तिने सांगितले. 

खासगी रुग्णालयातून घरी जात होती महिला

या रुग्णालयात बिल जास्त असल्याने २ दिवसानंतर तिने विनंती करून पतीला घेऊन गावी परतण्याचा निर्णय घेतला. हॉस्पिटलकडून त्यांना खासगी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. या रुग्णवाहिकेतून जाताना रस्त्यात चालकाने महिलेला पुढे बसण्यासाठी दबाव आणला. पोलीस चेकिंगची बतावणी करत महिलेला पुढे बसवले. त्यानंतर रुग्णवाहिका चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने महिलेचा विनयभंग केला. जेव्हा या महिलेने त्याला विरोध केला तेव्हा दीडशे किमी अंतरावर गावी पोहचण्यापूर्वी एका निर्जनस्थळी महिलेच्या पतीला फेकून दिले. ज्यात आजारी पतीला गंभीर दुखापत झाली. ऑक्सिजन निघाल्यामुळे पतीची तब्येत खराब झाली. 

पीडितेचा पोलिसांवरही आरोप

या घटनेबाबत महिला आणि तिच्या भावाने ११२ नंबरवर पोलिसांना फोन करून माहिती दिली. तेव्हा तातडीने रुग्णवाहिका पाठवून बस्तीच्या हॉस्पिटलमध्ये महिलेच्या पतीला दाखल केले. तिथून गोरखपूर येथे उपचारासाठी नेले मात्र तिथे पतीचा मृत्यू झाला. पोलिसांनी संबंधित रुग्णवाहिकेला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. पतीच्या अंत्यसंस्कारानंतर महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. 

दरम्यान, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा महिलेचा भाऊही तिथे होता. मागील केबिनमध्ये भाऊ असल्याने त्याला बहिणीचा आवाज आला नाही. बस्तीच्या आधी छावनी इथं रुग्णवाहिका थांबवली आधी बहिणीला खाली उतरवलं त्यानंतर दाजी आणि बहिणीचं सामान हिसकावून मलाही बाहेर फेकले असा आरोप महिलेच्या भावाने केला आहे.

Web Title: A woman was molested in an ambulance in Uttar Pradesh, a case was registered in the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.