कापूस वेचणाऱ्या महिलेवर अत्याचार, आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
By अनिल गवई | Published: March 21, 2023 09:11 PM2023-03-21T21:11:39+5:302023-03-21T21:11:53+5:30
२६ वर्षीय विवाहित महिलेबरोबर घडला होता प्रकार
अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (जि. बुलढाणा): कापूस वेचण्यासाठी जात असलेल्या महिलेला जबरदस्तीने शेतात नेत अत्याचार करणाऱ्या नराधमास दहा वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा महत्वपूर्ण निकाल खामगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.एस. काळे यांनी मंगळवारी दिला.
नांदुरा तालुक्यातील ईसरखेड येथील एक २६ वर्षीय विवाहिता शिवारात कापूस वेचण्यासाठी जात होती. इतर महिला पुढे गेल्याने ती एकटीच जात होती. कापूस वेचणी असलेले शेत पूर्णानदीच्या पलिकडच्या काठावर असल्याने विवाहिता एकटीच आरोपीच्या नावेत बसली. नावेतून उतरून ती शेतात जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करून एकांतात नेले. बळजबरीने अत्याचार केला. ही घटना २३ नोव्हेंबर २०१३ रोजी घडली होती.
ही आपबिती विवाहितेने आरोपीच्या पत्नीकडे कथन केली. त्यानंतर विवाहितेने जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तपासाअंती दोषारोप पत्र खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. सुनावणी दरम्यान, न्यायालयाने आठ साक्षीदार तपासले. आठही साक्षीदारांची साक्ष महत्वाची ठरली असून आरोप सिद्ध झाल्याने नंदकिशोर उखर्डा झाल्टे या नराधमास न्यायालयाने १० वर्ष सश्रम कारावास आणि २५ हजार रूपये दंड ठोठावला. तसेच, दंड न भरल्यास दोन वर्षाच्या साध्या कैदेचीही शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ॲड. वसंत भटकर यांनी कामकाज पाहिले.