शेतात गेलेल्या महिलेची गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करून हत्या
By आशपाक पठाण | Published: November 14, 2022 11:13 PM2022-11-14T23:13:41+5:302022-11-14T23:14:07+5:30
पोलीस अधिक्षक सोमय मुंढे, उपाधिक्षक निकेतन कदम यानी घटनास्थाळास भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या आहेत.
शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) : तालुक्यातील हालकी येथे एका महिलेची स्वत:च्याच शेतात गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळास पोलीस अधिक्षकानी भेट देऊन अज्ञात आरोपीचा तात्काळ तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, रात्री उशीरा पर्यंत शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांनी सांगितले, हालकी येथील अर्चना राम बेवनाळे (४०) या सोमवारी सायंकाळच्या सुमारास स्वत:च्या सोयाबीनची रास करण्याच्या कामी मदत करीत होत्या. रास करण्याचे काम संपल्यानंतर पती रामेश्वर बेवनाळे सोयाबीनचे पोते घरी घेऊन जाण्यासाठी बैलगाडी घेऊन येतो म्हणून गेले असता कोणीतरी अज्ञात आरोपीने धारधार तिक्ष्ण हत्याराने गळ्यावर, मानेवर समोरून आणि पाठीमागून सपासप वार करून खून करून पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे सपोनि पंकज शिनगारे, पोउपनि मानुल्ला, पोहेकाॅ. मलवाडे, अशोक बिरादार, संदिप तिपराळे , अंबादास पाटील यांनी घटनास्थाळास भेट देऊन पंचनामा केला.
तीन तपास पथके रवाना...
पोलीस अधिक्षक सोमय मुंढे, उपाधिक्षक निकेतन कदम यानी घटनास्थाळास भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या आहेत. अज्ञात आरोपीच्या शोधासाठी तीन तपास पथके तयार करून रवाना करण्यात आली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे यांनी सांगितले.