अनोळखी व्यक्तीला बँकेची माहिती देणे पडले महाग; पैसे लंपास
By धीरज परब | Published: September 21, 2022 01:21 PM2022-09-21T13:21:05+5:302022-09-21T13:21:26+5:30
महिलेने कादंबरी यांना बँकेचे मोबाईल मधील ऍप उघडायला सांगून बँक खात्याची माहिती विचारली .
मीरारोड - अनोळखी व्यक्तीला बँक खात्यांची माहिती देणे तसेच पैसे पाठवणे भाईंदरच्या तरुणीला महागात पडले . भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट मध्ये राहणाऱ्या कादंबरी महाजन यांचे ऍक्सिस बँकेत खाते आहे . त्यांना एका अनोळखी महिलेचा ऍक्सिस बँकेतून बोलत असल्याचा कॉल आला व क्रेडिट कार्ड एक्टीव्हेट करायचे आहे . ऍनी डेस्क हे ऍप इन्स्टॉल करायला सांगितले असता कादंबरी यांनी तसे केले .
महिलेने कादंबरी यांना बँकेचे मोबाईल मधील ऍप उघडायला सांगून बँक खात्याची माहिती विचारली . कादंबरी यांनी बँक खात्याची माहिती दिली . नंतर २९५ रुपये भरा व ते तुम्हाला परत मिळतील असे सांगितले . दुसऱ्या दिवशी त्या महिलेचा पुन्हा कॉल आला व पैसे परत मिळाले का विचारले असता कादंबरी यांनी नाही सांगितले . महिलेने एक बँक खाते पाठवून त्यात तुमच्या खात्यातील पैसे ट्रान्सफर करा सांगितले असता कादंबरी यांनी २९ हज २९५ रुपये त्या खात्यात पाठवले . पैसे जाताच त्या महिलेने कॉल कट केला आणि मोबाईल बंद करून टाकला . या प्रकरणी नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .