हातावर गोंदलेल्या टॅटूवरुन  महिलेची हत्या उघडकीस; पती सह दिराला अटक 

By धीरज परब | Published: June 3, 2023 03:03 PM2023-06-03T15:03:01+5:302023-06-03T15:05:07+5:30

चारित्र्याच्या संशय वरून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. दोघेही आरोपी मूळचे बिहारच्या सीतामढी भागातील आहेत. 

A woman's murder revealed by a tattoo on her arm; Dira arrested with her husband | हातावर गोंदलेल्या टॅटूवरुन  महिलेची हत्या उघडकीस; पती सह दिराला अटक 

हातावर गोंदलेल्या टॅटूवरुन  महिलेची हत्या उघडकीस; पती सह दिराला अटक 

googlenewsNext

मीरारोड - भाईंदरच्या पातान बंदर समुद्र किनारी बॅगेत सापडलेल्या महिलेच्या तुकड्यांची ओळख पटवून तिची हत्या करणाऱ्या पती व दिरास पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. चारित्र्याच्या संशय वरून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. दोघेही आरोपी मूळचे बिहारच्या सीतामढी भागातील आहेत. 

पातान बंदर समुद्र किनारी २ जून रोजी सकाळी ८ च्या सुमारास लाटांनी वाहून आलेल्या एका बॅगेत महिलेचे तुकडे सापडले होते. तिचे मुंडके त्यात नव्हते व धडाचे दोन तुकडे केलेले होते. महिलेची निर्घृण हत्या करून तिची ओळख पटू नये म्हणून तुकडे करून ते बॅगेत भरून पाण्यात फेकून दिले होते. मात्र महिलेच्या हातावर  त्रिशूल - डमरू व ओमचा टॅटू होता. 

उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराम करांडे यांनी हत्येचा गुन्हा दाखल करून घेत सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरवात केली. तर महिलेची क्रूरपणे हत्या व तुकडे केल्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत मीरा भाईंदर परिमंडळ १ चे उपायुक्त जयंत बजबळे यांनी सर्व पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपास पथके नेमली. त्यांना आवश्यक सूचना देत मार्गदर्शन केले. 

 काशीमीरा व नवघर पोलीस ठाण्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे व महेश मनोरे, उपनिरीक्षक अभिजित लांडे व संदीप यादव सह प्रदीप उबाळे, कुणाल कुरेवाड, अनिल पवार, भुषण पाटील, सुरेश चव्हाण, निलेश शिंदे, मंगेश शिंदे, संजय कोंडे, राजेश आसवले, प्रदीप गवळी, रवींद्र बागुल, रवी कांबळे, हनुमंत माने, घुणावत, जाधव यांच्या पथकाने संयुक्तरित्या तपास करत महिलेची टॅटू वरून ओळख पटवून हत्येचा गुन्हा उघडकीस आणला.  

हत्या झालेल्या महिलेचे नाव अंजली मिंटु सिंग (२३) रा. राज अपार्टमेंट, डांबर प्लॅट जवळ, राजवली गांव रोड, नायगांव (पुर्व) असे आहे. २४ मे रोजी तिचा पती मिंटु रामब्रिज सिंग (३१) याने चारित्र्याच्या संशय वरून अंजलीची घरातच निर्घृण हत्या केली. तिचे तुकडे केले व बॅगेत भरले. ती बॅग त्याने मोठा भाऊ चुनचुन रामब्रिज सिंग (३५) रा.  महाविर नगर, पुष्पा हॅरिटेज, डहाणुकरवाडी रोड, कांदिवली (प) यांच्यासह मिळून पुलावरून खाडीत टाकून दिली होती. त्या दोघांना २ जून रोजी सायंकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतले. 

दोन्ही आरोपीना उत्तन सागरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराम करांडे हे पुढील तपास करीत आहेत.  पोलीस  अंजलीचे मुंडके कुठे टाकले ? तसेच हत्या व तुकडे करण्यासाठी वापरलेल्या शस्त्रांचा शोध घेत आहेत. अंजली व मिंटू यांचा १४ महिन्यांचा मुलगा आहे. 

Web Title: A woman's murder revealed by a tattoo on her arm; Dira arrested with her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.