मेट्रोमधील गर्दीचा गैरफायदा घेत तरुणीचा विनयभंग; CCTV च्या मदतीनं नराधमाला अशी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 09:07 AM2022-04-29T09:07:50+5:302022-04-29T09:12:09+5:30
ब्लूलाईन मेट्रोमध्ये गर्दीचा फायदा घेत मुलीचा विनयभंग आणि गैरकृत्य केल्याप्रकरणी मेट्रो पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
नवी दिल्ली-
ब्लूलाईन मेट्रोमध्ये गर्दीचा फायदा घेत मुलीचा विनयभंग आणि गैरकृत्य केल्याप्रकरणी मेट्रो पोलिसांनी एकाला अटक केली आहे. संजीव कुमार (३९, रा. कृष्णा नगर) असं आरोपीचं नाव आहे. तरुणीच्या लेखी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध यमुना डेपो मेट्रो पोलिस ठाण्यात कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेट्रोचे डीसीपी जितेंद्र मणी यांनी दिलेल्या माहितीनुसार २१ एप्रिल रोजी एका तरुणीनं यमुना डेपो येथील मेट्रो पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली. तरुणीनं पोलिसांना सांगितलं की, ती कड़कड़डूमा येथून ब्लूलाइन मेट्रोमध्ये चढली होती. त्यावेळी ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. त्यानंतर कोचमध्ये तिच्या जवळ उभा असलेला एक तरुण तिच्या अगदी जवळ आला आणि त्यानं गर्दीचा गैरफायदा घेत छेडछाड सुरू केली. त्यानं अनुचित स्पर्श करण्यास सुरुवात केली. तरुणीनं आक्षेप घेतला, मात्र तरुणानं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तरी त्याचा नालायकपणा थांबला नाही. मुलगी अस्वस्थ झाली आणि तिनं ट्रेन थांबवण्याचा विचार केला, परंतु डब्यातील आपत्कालीन बटण तिच्या आवाक्याबाहेर होतं.
अर्ध्यावरच सोडला मेट्रो प्रवास
दरम्यान, यमुना बँक मेट्रो स्टेशनवर येताच तरुणी ट्रेनमधून खाली उतरली. त्यानंतर विनयभंग करणारा तरुणही ट्रेनमधून खाली उतरून तिच्या मागे आला. त्यानं पीडित तरुणीशी बोलण्याचाही प्रयत्न केला, मात्र तरुणीनं त्याला टाळण्याचा प्रयत्न करत केला. त्याचवेळी एका महिला प्रवाशानं पोलिसांना फोन केला, मात्र पोलिस तिथं पोहोचण्यापूर्वीच आरोपी पळून गेला. त्यानंतर मुलीनं संपूर्ण माहिती पोलिसांना दिली, त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीला बेड्या
आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी डीसीपी जितेंद्र मणी यांनी मेट्रो युनिटच्या विशेष कर्मचार्यांचं पथकही या प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त केलं. विशेष कर्मचार्यांचे प्रभारी निरीक्षक अजय कुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकानं तरुणीकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. कड़कड़डूमा आणि यमुना बँक मेट्रो स्थानकांवर ट्रेनच्या डब्यात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर आरोपीची माहिती काढण्यात आली आणि त्याला प्रीत विहार मेट्रो स्टेशनवरुन अटक करण्यात आली. आपल्या बचावात आरोपीनं आपण जाणूनबुजून काहीच केलेलं नाही असा युक्तिवाद केला. मेट्रोमध्ये जास्त गर्दी आणि भांडणामुळे त्यानं मुलीला धडक दिली होती, परंतु मुलीनं तिच्या तक्रारीत अतिशयोक्ती केली आहे असा दावा आरोपीनं केला आहे.