नेरळ: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा चिरल्यानंतर तरुणाची आत्महत्या
By जमीर काझी | Published: October 1, 2022 05:05 PM2022-10-01T17:05:48+5:302022-10-01T17:06:12+5:30
चिमुकल्याने डोळ्यांनी पाहिला जन्मदात्यांचा अंत
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन तिचा धारदार सुरीने गळा चिरुन हत्या केल्यानंतर तरुणाने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार शनिवारी सकाळी कर्जत तालुक्यातील नेरळ येथील कोल्हारे गावातील साई मंदिर परिसरातील चाळीत घडली. पुजा पिंटू राम (वय २४) व पिंटू राम (२८) अशी त्यांची नावे असून या घटनेने परिसरात काहीकाळ खळबळ उडाली. पिंटूने सासूच्या घरी जावून हे कृत्य केले. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. हे दाम्पत्य मुळचे बिहारचे असून गेल्या काही वषार्पासून नेरळ मधील मोहाचीवाडी पुढील समाधान चाळ येथे दोन लहान मुलांसोबत भाड्याने खोली घेवून राहत होते.
वेल्डिंगची कामे करणाऱ्या पिंटूला दारुचे व्यसन होते. तो पुजाच्या चारित्र्याच्या संशय घेवून तिला नेहमी मारहाण करीत असे, वारंवारच्या भांडणाला कंटाळून पुजा ही दोन्ही मुलांना घेवून २५ सप्टेंबरला कोल्हारेतील साई मंदिरजवळील मोहिते चाळीत रहात असलेल्या आईजवळ गेली होती. ती अद्याप घरी परत न आल्याने पिंटू राम आज सकाळी सासरवाडीत गेला. सासू व मेव्हणी मजुरीसाठी गेल्यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याचे पुजाबरोबर पुन्हा भांडण झाले. तिने घरी येण्यास नकार दिल्यानंतर तो तिला मारहाण करु लागला. त्यावेळी झटापटीत पुजाच्या हातातील लोंखडी कात्री लागल्याने पिंटू चिडला. आपल्याजवळील धारदार सुऱ्याने तिच्या गळ्यावर सपासप वारंवार केले.
रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर थोड्याच वेळात ती मृत पावली. त्यावेळी घाबरलेल्या पिंटूने घरातच दोरीने गळफास लावून घेतला. त्यांच्यातील भांडणामुळे घाबरलेल्या मुले जोरात रडू लागली. त्यांच्या आवाजाने शेजाऱ्यांनी घरात येवून पाहिले असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. बघ्याची मोठी गर्दी झाली होती. ग्रामस्थांनी पोलिसांना कळवून दोघांना रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र तेंडूलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दारुचे व्यसन व पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन तो पत्नीला नेहमी मारहाण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. चिमुकल्यानी डोळ्यांनी पाहिला जन्मदात्यांचा अंत पूजा व पिंटूराम यांना ६ आणि ४ वर्षांची दोन मुले आहेत. दोघातील भांडणाच्या आवाजामुळे ती झोपेतून रडत उठली. पिंटूने पुजाच्या गळ्यावर वार केल्यानंतर स्वत: घरात गळफास लावून घेतला. आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर पित्याने गळफास घेतल्याचे त्यांनी पाहिले. घाबरल्याने हंबरडा फोडत ती बाहेर पळत आल्यानंतर शेजाऱ्यांना या प्रकाराची कल्पना आहे.