तरुणाने आई आणि मुलाचा खून करून स्वत:लाही संपवलं, लॅपटॉपमधील व्हिडिओतून कारण उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 15:54 IST2024-02-11T15:51:38+5:302024-02-11T15:54:09+5:30
युवकाने मुलगा आणि आईची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचं त्याच्या लॅपटॉपमधील व्हिडिओतून स्पष्ट झालं आहे.

तरुणाने आई आणि मुलाचा खून करून स्वत:लाही संपवलं, लॅपटॉपमधील व्हिडिओतून कारण उघड
उत्तर प्रदेशातील आग्रा इथं रविवारी सकाळी एका घरात कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मृतांमध्ये आई, मुलगा आणि चिमुकल्याचा समावेश आहे. तरुणाने आपल्या वृद्ध आईचा खून केल्यानंतर लहानग्या मुलाला संपवलं आणि नंतर स्वत:ही आत्महत्या केली. तरुणाने आत्महत्येपूर्वी लॅपटॉपमध्ये शूट करून ठेवलेल्या व्हिडिओतून त्याने हे भयंकर कृत्य का केलं, यामागील कारणाचा उलगडा झाला आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील लॉयर्स कॉलोनीमध्ये मानसिंह चौहान यांचं कुटुंब वास्तव्यास होतं. मात्र कोरोना काळात मानसिंह यांचा मृत्यू झाला. मानसिंह यांचा मुलगा तरुण चौहान उर्फ जॉली हा पत्नी रजनी, मुलगा कुशाग्र आणि आई ब्रजेश चौहान यांच्यासोबत आता राहत होता. मात्र रविवारी सकाळी घरकाम करणारी महिला जेव्हा चौहान यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिला तरुण चौहान याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. हे चित्र पाहून धक्का बसल्याने सदर महिलेने मोठ्याने आरडाओरड सुरू केली. त्यानंतर शेजाऱ्यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना कळवली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना घरात तरुणचा मृतदेह आढळला आणि एका खोलीत मुलगा कुशाग्र आणि आई ब्रजेश यांचेही मृतदेह आढळून आले. तरुण याने मुलगा आणि आईची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचं त्याच्या लॅपटॉपमधील व्हिडिओतून स्पष्ट झालं आहे.
तरुण हा वडिलांचा मृत्यू झाल्यापासून तणावात होता. तो एका कंपनीत काम करत होता. मात्र तो दारूच्या व्यसनात बुडाला होता. त्यामुळे त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. रविवारी सकाळी त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ शूट केला आणि त्यामध्ये सांगितलं की कर्जाच्या तणावामुळे मी एक खूप चुकीचा निर्णय घेत आहे, मात्र माझ्याकडे कोणताच पर्याय नाही.
दरम्यान, तरुण चौहान याने आई आणि मुलाच्या जेवणात विष टाकून त्यांची हत्या केली होती आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे.