संतापजनक... युवतीवर आळीपाळीने अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल; एकाला अटक
By संतोष वानखडे | Published: June 19, 2023 06:00 PM2023-06-19T18:00:43+5:302023-06-19T18:01:25+5:30
याप्रकरणी पीडित युवतीने मानोरा पोलीस स्टेशनला १८ जूनला फिर्याद दिल्याने तिघांवर विविध कलमान्वे गुन्हे दाखल करीत एका आरोपीला अटक केली.
वाशिम : मानोरा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या एका गावातील २२ वर्षाच्या युवतीवर तीन नराधमांनी माहुली शेत शिवारात १६ जून ते १८ जूनपर्यंत आळीपाळीने बलात्कार केला. याप्रकरणी पीडित युवतीने मानोरा पोलीस स्टेशनला १८ जूनला फिर्याद दिल्याने तिघांवर विविध कलमान्वे गुन्हे दाखल करीत एका आरोपीला अटक केली. कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी प्रकरण तपासात घेतले.
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, मानोरा तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय युवती आपले घरावरील टीन व सिमेंट घेण्यासाठी मानोरा येथील एका दुकानात वडिलासोबत आली असताना दुकानात काम करणारा मिथुन जनार्थन राठोड याच्यासोबत तिची ओळख झाली. अधूनमधून तो तिला फोनही करायचा. १६ जूनला फोन करून त्याने पिडीत युवतीला भेटायला बोलाविले. दुपारी १ वाजता तो मित्र नितीन दयाराम पवार याच्यासोबत दुचाकीने आला. तेवढ्यात मिथुन राठोडला दुकानावरून फोन येत असल्याने तो निघून गेला आणि युवतीला गावी सोडून दे, असे त्याने मित्राला सांगितले. मित्राने मात्र युवतीस घरी न नेता एका शेतशिवारात नेवून बलात्कार केला.
त्यानंतर फोनवर देवसरी उत्तम चव्हाण यालाही बोलाविले. त्यानेसुद्धा बलात्कार केला. ही घटना १६ जून ते १८ जूनदरम्यान घडली. मुलगी घरी न आल्याने पीडित युवतीचे आई वडील मानोरा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले. याची कुणकूण आरोपींना लागल्याने त्यांनी पिडितेस मोटारसायकलने गणेश मंदिर जवळ सोडले. पीडित युवतीने मानोरा पोलीस स्टेशन गाठून आइजवळ आपबिती कथन केली. याबाबत पिडीत युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून तीन आरोपी विरुद्ध भादंवी कलम ३७६ (२ )( एन), (डी) ५०४,५०६ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
पीडितेची अधिक चौकशी केली असता, मिथुन राठोड यानेसुद्धा अतिप्रसंग केल्याची बाब तपासातून समोर आली. या प्रकरणात आरोपी नितीन पवार याला अटक करण्यात आली असून घटनेचा तपास कारंजा पोलीस उपविभागीय अधिकारी जगदीश पांडे, पोलीस उपनिरीक्षक सविता वड्डे, पोलीस हेड कास्टेबल रवी राजगुरे हे करीत आहेत.