स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवतीला संपवलं; ३ दिवसांपूर्वी हत्येचं प्लॅनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 09:10 AM2023-07-29T09:10:33+5:302023-07-29T09:10:59+5:30
पोलिसांनी या घटनेतील आरोपीला अटक केली आहे. आरोपी नरगिसच्या मावशीचा मुलगा इरफान आहे.
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत एकाच दिवसात २ महिलांची हत्या झाल्याचे समोर आले. वैशाली भागात एका युवकाने भररस्त्यात महिलेला गोळी झाडली तर दुसरीकडे मालवीय नगरमध्ये २३ वर्षीय युवतीच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला करून तिची हत्या करण्यात आली. नरगिस असे या मृत युवतीचे नाव आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या नरगिसला २ भाऊ आहेत. स्वत:च्या पायावर उभं राहून कुटुंबाला मदत करण्याचं तिचे स्वप्न होते. परंतु ज्या व्यक्तीला ती कित्येक वर्ष ओळखते तोच तिच्या जीवावर उठेल याची तिला कल्पना नव्हती.
पोलिसांनी या घटनेतील आरोपीला अटक केली आहे. आरोपी नरगिसच्या मावशीचा मुलगा इरफान आहे. ३ दिवसांपूर्वी इरफानने नरगिसच्या हत्येचं प्लॅनिंग केले होते. नरगिस कोणत्या रस्त्याने जाते याची रेकी त्याने केली. त्यानंतर संधी मिळताच नरगिसची हत्या केली. मालवीय पोलिसांनी आरोपी इरफानला बेड्या ठोकल्यानंतर चौकशीत अनेक खुलासे समोर आले आहेत. आरोपीने तपासात सांगितले की, नरगिस स्टेनो कोचिंगसाठी मालवीयला जात होती. सर्वात आधी त्याने नरगिसचा पाठलाग करत तिची रेकी केली. दुपारी १२ च्या सुमारात नरगिस कोचिंगसाठी जात असताना तिला थांबवले आणि शिवालिक ए ब्लॉकच्या विजय मंडल पार्कमध्ये नेले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी इरफानने नरगिससोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला नरगिसने नकार दिला. त्यानंतर आरोपीने लोखंडी रॉडने तिच्या डोक्यावर हल्ला केला, त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. नरगिसचा भाऊ समीरने म्हटलं की, इरफान आमच्या मावशीचा मुलगा होता. तो उत्तर प्रदेशातील औरेया जिल्ह्यात राहायचा. जवळपास ५-६ वर्ष तो आमच्यासोबतच राहायचा. इरफान मॅकेनिकचे काम शिकत होता. त्यावेळी तो नरगिसला त्रास देत होता. ते आम्हाला कळाल्यानंतर आम्ही त्याला ओरडलो. दीड वर्षापूर्वी तो त्याच्या घरी परतला. तिथे त्याने काम करण्यास सुरूवात केली.
इरफान सैन्यदलात नोकरीसाठी प्रयत्न करत होता. मागील वर्षी त्याला अपयश आले. त्यानंतर तो दिल्लीत आला. त्याने फूड डिलिव्हरी काम करायला सुरुवात केली. दिल्लीच्या संगम विहार इथं तो राहायचा. ६ महिन्यापूर्वी आमच्या कुटुंबाने इरफानसोबत नरगिसच्या लग्नाचा प्रस्ताव नाकारला. माझ्या बहिणीला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते. आई वडील या लग्नाला तयार नव्हते. कारण इरफानकडे कुठलाही पर्मंनट जॉब नव्हता असंही भावाने सांगितले.
मात्र नरगिस आणि इरफान दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू होती. परंतु नरगिसच्या कुटुंबाने दोघांच्या लग्नाला नकार दिला. त्यानंतर नरगिसने इरफानसोबत बोलणे सोडले, त्यामुळे तो संतापलेला होता असं पोलिसांनी सांगितले. मुलीच्या हत्येनंतर वडिलांनी आरोपी इरफानला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. नरगिस त्यांची एकुलती एक मुलगी होती. माझ्या नरगिसला न्याय द्या अशी विनवणी वडील करत होते.
शासकीय नोकरीची करत होती तयारी
नरगिसने पदवीचे शिक्षण घेतले होते त्यानंतर ती शासकीय नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. दिल्लीतील कॉलेजमध्ये ती शिकत होती. ज्याठिकाणी नरगिसची हत्या झाली ती दिल्लीतील उच्चभ्रू परिसरात येते. शेजारीच अरविंदो कॉलेज आहे. त्यामुळे याठिकाणी दिवसभर मुला-मुलांची लगबग असते. आरोपीने सर्वांच्या समोर नरगिसची हत्या केली आणि तिथून पळून गेला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.