१५ वर्ष हिंदू बनून राहिली युवती, लग्नही केलं; एका चुकीनं पोलखोल झाली, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 03:41 PM2022-01-29T15:41:40+5:302022-01-29T15:42:21+5:30
रोनी बेगम १२ वर्षाची असताना भारतात आली होती
बंगळुरु – भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करुन इथं राहणाऱ्या बांगलादेशींचा मुद्दा कायम चर्चेत असतो. सीमेपलीकडून अवैध घुसखोरी करुन ते देशातील विविध शहरांमध्ये वास्तव्यास जातात. कर्नाटक पोलिसांनी बंगळुरुच्या परिसरात फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफ इंडियाच्या आधारे २७ वर्षीय एका बांगलादेशी घुसखोर महिलेला अटक केली आहे. जी मागील १५ वर्ष भारतात हिंदू बनून राहत होती.
या बांगलादेशी महिलेचं नाव रोनी बेगम असं आहे. गेल्या १५ वर्षापासून ती भारतात पायल घोष या नावानं वास्तव्य करत आहे. तसेच मंगळुरुच्या एका डिलिवरी एक्जीक्यूटिव्ह नितीन कुमारसोबत तिने लग्न केले. पोलिसांच्या माहितीनुसार, फरार नितीन कुमार याचाही शोध पोलीस करत आहे. ३ महिन्याच्या शोध मोहिमेनंतर रोनी बेगमला अटक करण्यात आली आहे. रोनी बेगम १२ वर्षाची असताना भारतात आली होती आणि त्यानंतर मुंबईत एका डान्स बारमध्ये डान्सर म्हणून काम करत होती. त्यानंतर तिने स्वत:चं नाव बदलून पायल घोष ठेवलं आणि बंगाली असल्याचा दावा केला.
बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवलं
विशेष म्हणजे, रोनी बेगम आणि नितीन एकमेकांवर प्रेम करत होते. तिने नितीनसोबत लग्न केले. लग्नानंतर २०१९ मध्ये बंगळुरुच्या अंजननगर परिसरात ती राहत होती. रोनीनं याठिकाणी टेलरचं काम सुरु केले. जेव्हा हे दोघं मुंबईत होते तेव्हा तिने पॅन कार्ड बनवलं होतं आणि नितीननं बंगळुरुतील त्याच्या मित्राच्या मदतीनं रोनी बेगमला आधार कार्ड बनवून दिलं.
एका चुकीनं झाली पोलखोल
रोनी बेगमला तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी बांगलादेशला जायचं होतं. ती कोलकाताला गेली आणि त्याठिकाणाहून ढाका येथे पोहचण्याची योजना होती. इमिग्रेशन अधिकाऱ्यांना तिच्या पासपोर्ट कागदपत्रावर संशय आला. त्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर ती बांगलादेशी घुसखोर असल्याचं उघड झालं. रानी बेगम बंगळुरुला परतली होती. तेव्हा FRRO नं बंगळुरु पोलिसांना माहिती दिली. सध्या पोलीस आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड देणाऱ्याचा शोध घेत आहे. पोलीस आरोपींच्या शोधासाठी मुंबई, कोलकाता, देशातील अन्य भागात शोध घेत आहे.