सकाळपासून दिसला नाही म्हणून शोधायला गेले अन् तरुणाचा मृतदेह सापडला
By Ajay.patil | Published: October 8, 2023 02:51 PM2023-10-08T14:51:52+5:302023-10-08T14:52:06+5:30
जळगावातील खोटेनगरात तरुणाची आत्महत्या : तीन बहिणींच्या एकुलत्या एक भावाने संपविले जीवन
जळगाव : आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर एकटाच राहत असलेल्या बाळासाहेब लोटन पवार (३५, रा. खोटेनगर) या अविवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळपासून घराबाहेर दिसला नाही म्हणून घरमालक दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्याला पहायले गेले असता हा तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
औद्योगिक वसाहतमधील एका कंपनीत कामाला असलेल्या बाळासाहेब पवार याच्या आई-वडिलांचे चार ते पाच वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तर तीन बहिणींचे लग्न झाले आहे. त्यामुळे हा तरुण जळगावातील खोटेनगरात भाडेतत्वाच्या घरात एकटाच राहत होता. रविवार, ८ ऑक्टोबर रोजी दुपार झाली तरी तो घराबाहेर आला नाही, त्यामुळे घरमालक त्याला पहायला गेले असता त्यांना हा तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्या वेळी त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने तरुणाला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. या तरुणाने शनिवारी रात्रीच गळफास घेतला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.
एकुलता एक भाऊ गेला
बाळासाहेब पवार याला तीन बहिणी असून त्या सुरत, पुणे व धुळे जिल्ह्यातील नंदाडे येथे राहतात. अगोदरच आई-वडिलांचे निधन झालेले व त्यात एकुलत्या एक भावानेही जीवन संपविल्याने बहिणींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.