सेल्फीचा नाद युवकाच्या जीवावर बेतला; फक्त एक चूक अन् डोक्याच्या चिंधड्या उडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 11:38 AM2022-03-14T11:38:56+5:302022-03-14T11:39:30+5:30
या घटनेची माहिती मिळताच कुटुंब घटनास्थळी पोहचले त्यांनी जखमी अवस्थेत युवकाला हॉस्पिटलला नेले परंतु त्याठिकाणी डॉक्टरांनी सचिनला मृत घोषित केले.
धौलपूर - तुम्ही नेहमी पाहिलं असेल सोशल मीडियावर सेल्फी पोस्ट करण्याचं वेड अनेकांना असतं. त्यासाठी विविध फोटो काढण्याची हौस तरुणाईला असते. सेल्फी क्रेझ सध्याच्या युवकांमध्ये खूप आहे. एकीकडे फोनमध्ये नव्या तंत्रज्ञानासोबत फिचर्समध्ये अपडेट आले आहेत. बाजारात नवनवीन फिचर्स स्मार्टफोन उपलब्ध झाले आहेत. ज्याने सेल्फी घेण्यासाठी नवं तंत्रज्ञान विकसित केले आहे. परंतु याच सेल्फीच्या नादात काही जण स्वत:चा जीव धोक्यात घालत असल्याचंही समोर आलं आहे.
आज अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात सेल्फी घेण्याचा नाद युवकाच्या जीवावर बेतला आहे. राजस्थानच्या धौलपूर येथील युवकाचा गोळी लागल्यानं मृत्यू झाला आहे. बंदुकीसोबत सेल्फी घेताना चुकून ट्रिगर दाबला गेल्यानं युवकाचा मृत्यू झाला आहे. १९ वर्षीय मुलासोबत ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने युवकाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उमरेह गावात १९ वर्षीय विद्यार्थी बेकायदेशीर शस्त्रासोबत सेल्फी घेण्याच्या नादात जीव गमावला आहे.
युवकाचा गोळी लागून घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. घरच्यांनी गोळीचा आवाज ऐकल्यानंतर तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा युवक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. युवकाला हॉस्पिटलमध्ये नेले परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, रविवारी १९ वर्षीय युवक सचिन शेतात त्याच्या मित्रांसोबत फिरायला गेला होता. तेव्हा त्याठिकाणी सेल्फी घेण्यासाठी युवकाने त्याच्याकडील अवैध शस्त्र काढलं आणि सेल्फी घ्यायला लागला. ज्यावेळी मृत व्यक्ती सचिन मोबाईलवरुन फोटो क्लिक करायला लागला तेव्हा त्याच्या दुसऱ्या हातातील ट्रिगर चुकीनं दाबला गेला ज्यामुळे गोळी थेट युवकाच्या डोक्यात घुसली.
गोळीनं युवकाच्या डोक्याच्या चिंधड्या उडाल्या. या घटनेची माहिती मिळताच कुटुंब घटनास्थळी पोहचले त्यांनी जखमी अवस्थेत युवकाला हॉस्पिटलला नेले परंतु त्याठिकाणी डॉक्टरांनी सचिनला मृत घोषित केले. घटनेनंतर सचिनचा मृतदेह घेऊन कुटुंब घरी परतत होते तेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी रस्त्यातच पोलिसांनी मृतदेह अडवला आणि कुटुंबाची चौकशी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवला. मृत युवक बीएच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता.