सीसीटीव्ही फुटेजचा आधार अन् पोलिस हरयाणात!
By नितिन गव्हाळे | Published: January 18, 2023 06:01 PM2023-01-18T18:01:47+5:302023-01-18T18:02:18+5:30
पोलिसांनी युसूफ खान आस मोहम्मद (३५) याला अटक केली.
अकोला : केशव नगरातील रिंगरोडवरील एसबीआयचे एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने फोडून त्यातील १६ लाख ५४ हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना ५ जानेवारी रोजी पहाटे घडली होती. त्यासाठी चोरट्यांनी महागड्या क्रेटा कारचा वापर केला. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी चौकाचौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज घेऊन कारचा माग काढला. सायबर पोलिसांचीही मदत घेतली. एटीएम फोडणारी ही टोळी हरयाणाची असल्याचे समोर आले. पोलिस हरयाणा येथे पोहोचले. त्यांनी आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले. पोलिसांनी युसूफ खान आस मोहम्मद (३५) याला अटक केली.
एटीएम फोडून १६ लाख रुपयांची रक्कम पळवित, चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले होते. हे आव्हान पोलिसांनी स्वीकारत, १४ दिवसांमध्ये काही पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हरयाणा गाठून या चोरीत सहभागी असलेल्या युसूफ खान आस मोहम्मद (३५, रा. पिनागवा, ता. पुन्हाना, जि. नुह, राज्य हरयाणा) याच्या मुसक्या आवळल्या. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, एटीएम फोडण्याच्या कटात सद्दाम माजीद (रा. पडली, जि. नुह), अताउल्ला खान (रा. पडली, जि. नूह), सलीम खान हनीफ खान (रा. पिनागवा) व संजय यादव (रा. रामगड, जि. अलवर, राजस्थान) यांचाही समावेश असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
पोलिसांनी आरोपी युसूफ खान याला अटक करून अकोल्यात आणून पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या समोर हजर केले. पोलिस अधीक्षकांनीही युसूफची चौकशी केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, एपीआय गोपाल ढोले, पीएसआय गोपाल जाधव, गोकुळ चव्हाण, खुशाल नेमाडे, लीलाधर खंडारे, मो. आमिर, मो. अन्सार, सतीश पवार, अक्षय बोबडे व प्रवीण कश्यप यांच्या पथकाने केली.
हजारो किमी प्रवास करून एटीएम फोडले
आरोपी युसूफ खान, सद्दाम माजीद, अताउल्ला खान, सलीम खान हनीफ खान आणि संजय यादव यांनी एकत्र येऊन एटीएम फोडण्याचा कट रचला आणि हजारो किमीचा प्रवास करून ही टोळी अकोल्यात पोहोचली. या टोळीने केशव नगरातील एसबीआयचे एटीएममध्ये शिरून त्यातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि अलार्मसुद्धा तोडून १६ लाखांची रोकड पळविली होती.
...अखेर एटीएम फोडणाऱ्यांची टोळी गवसली!
स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी याप्रकरणाचा युद्धपातळीवर तपास करून १४ दिवसांतच टोळीचा छडा लावत, हरयाणातून टोळीतील एका सदस्याला अटक करण्यात यश मिळविले. टोळीतील उर्वरित चार आरोपींना लवकरच गजाआड करू, असा विश्वास पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी बुधवारी व्यक्त केला.