आधार कार्ड, पासपोर्टसाठी आमदाराच्या लेटरहेडचा वापर, साकीनाक्यात बांगलादेशींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 01:34 AM2020-11-03T01:34:03+5:302020-11-03T01:34:24+5:30
Crime News : साकीनाका परिसरातून दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली होती. चाैकशीत ते बांगलादेशी असल्याचे उघड झाले.
मुंबई : बांगलादेशी नागरिकांना मुंबईत आल्यावर बोगस आधार कार्ड आणि पासपोर्ट बनविण्यात मदत करणाऱ्या दलालांना साकीनाका पोलिसांनी अटक केली. यासाठी त्यांनी दोन आमदारांचे लेटरहेड वापरल्याची माहिती समाेर आली आहे.
साकीनाका परिसरातून दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली होती. चाैकशीत ते बांगलादेशी असल्याचे उघड झाले. स्थानिक पातळीवरील महत्त्वाची कागदपत्रे बनवण्यासाठी दोन आमदारांच्या लेटरहेडचा वापर त्यांनी केल्याचे तपास अधिकाऱ्याचे म्हणणे असून अशी सात पत्रे सापडली आहेत. त्या लेटरवर आमदार मुफ्ती मुहम्मद इस्माईल अब्दुल खालीख आणि आमदार शेख असिफ शेख रशीद यांची नावे आहेत. आता ही पत्र, लेटर या आमदारांनीच दिली होती की तीही बनावट आहेत याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्यांनी मोबाइलमधून इंटरनेटद्वारे त्यांच्या कुटुंबातील बांगलादेश येथे राहणाऱ्या लोकांशी संवाद साधल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पासपोर्ट ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला. मुंबईमधील एजंट त्यांना राहण्याची आणि जेवणाची सुविधा उपलब्ध करून देतात, तसेच भारताची ओळखपत्रे मिळवण्यासाठीही त्यांना मदत मिळते, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
मालेगावच्या एका एजंटची चौकशी करत त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात भारतीय ओळखपत्रे वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने सापडली. या एजंटना आधार कार्ड बनविण्यासाठी कोण मदत करत आहे, याचा शोध साकीनाका पोलीस घेत आहेत.