आरे आंदोलन प्रकरण : २९ जणांना कोर्टाने जामीन केला मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 05:22 PM2019-10-06T17:22:07+5:302019-10-06T17:23:29+5:30
शनिवारी सकाळी जमावबंदीचे आदेश लागू करून पोलिसांनी २९ जणांना अटक केली होती.
मुंबई - आरे तोडीविरोधात आंदोलन करणाऱ्या अटक २९ जणांना बोरिवली कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आरे कॉलनी मेट्रो 3 कारशेडसाठी शुक्रवारी झाडे तोडली. त्यावेळी विरोध करणाऱ्या २९ जणांना अटक केली होती. त्या सर्वांना कोर्टाकडून रविवारी जामीन मंजूर करण्यात आला. भुयारी मेट्रो - तीनच्या कारशेडसाठी आरे कॉलनीत वृक्षतोड सुरू झाली असून त्यास विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना रोखण्यासाठी पोलिसांना नाकाबंदी करावी लागली. शनिवारी सकाळी जमावबंदीचे आदेश लागू करून पोलिसांनी २९ जणांना अटक केली होती.
अटक झालेल्यांची सात हजार रुपये भरून जामीनावर सुटका होईल.मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीविरोधात आंदोलन करताना अटक झालेल्या २९ जणांच्या कुटुंबियांची आज गोरेगावमध्ये पत्रकार परिषद देखील घेतली होती. मुंबई पोलीसांनी चुकीच्या पद्धतीनं २३ पुरूष आणि ६ महिलांना अटक केल्याचा आरोप या परिषदेत करण्यात आला. अटक केलेल्यांमध्ये विद्यार्थ्यांसह स्थानिक आदिवासींचाही समावेश आहे.
आरे येथील वृक्षतोडीला शुक्रवारी रात्री सुरुवात करण्यात आली. ज्यानंतर पर्यावरणप्रेमींनी या प्रकाराला विरोध दर्शवत आरे बचाव आंदोलन सुरु केलं होतं. प्रशासनाविरुद्ध पर्यावरणप्रेमींनी हा लढा उभा केला. एका रात्रीत ४०० पेक्षा जास्त झाडं तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी आणि मुंबईकरांचा संताप उफाळून आला होता. दरम्यान, शनिवारी २९ जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या सगळ्यांना बोरीवली न्यायालयापुढे हजरही करण्यात आले. ज्यानंतर सगळ्या आंदोलकांना बोरीवली कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
मुंबई - आरे वृक्ष तोडविरोधात आंदोलन करणाऱ्या अटक २९ जणांना बोरिवली कोर्टाने जामीन केला मंजूर https://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) October 6, 2019