अबब... व्हेल माशाची तीन कोटींची उलटी; श्रीनगर पोलिसांनी दोघांना केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 09:30 AM2023-12-23T09:30:18+5:302023-12-23T09:30:26+5:30
दाेन्ही आराेपींना २६ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने पाेलिस काेठडी ठोठावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उच्च प्रतीच्या अत्तर (सेंट) निर्मितीसाठी आवश्यक असलेली व्हेल माशाची उलटी तस्करीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील मुझमिल मझर सुभेदार (४५) आणि म्हसळा येथील शहजाद शब्बीर कादरी (४५) या दोघांना ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तीन कोटींची किमतीचे अंबरग्रीस अर्थात व्हेल माशाची उलटी जप्त केली, अशी माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.
दाेन्ही आराेपींना २६ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने पाेलिस काेठडी ठोठावली आहे. वागळे इस्टेट रोड क्रमांक १६ येथे काही जण व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांना मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवराज बेंद्रे आदींच्या पथकाने वन विभागाचे वनपाल अशोक काटेस्कर यांच्या पथकाने यातील दोघा संशयितांना सापळा लावून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरु आहे.
वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा
n चौकशीमध्ये त्यांच्याकडून अंगझडतीमध्ये एका सॅकमध्ये पिवळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेली सुमारे तीन कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी होती. व्हेल माशाच्या वांतीचा (अंबर ग्रिस) मोठ्या आकाराचा तुकडा हा तपकिरी रंगाचा आहे.
n वन्यजीव अधिनियमानुसार ते मृगयाचिन्ह असून ते अनुसूची एकमध्ये मोडते. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी व्हेलची ही वांती नेमकी कुठून आणली आणि ती कोणाला विक्रीसाठी नेली जात होती.
n त्यांनी यापूर्वीही असे प्रकार केले आहेत किंवा कसे? याचा तपास सुरू असल्याचे श्रीनगर पोलिसांनी सांगितले.