पार्किंगच्या वादातून व्यावसायिकाच अपहरण; तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 09:56 PM2021-05-08T21:56:33+5:302021-05-08T21:56:56+5:30
Kidnapping : पोलीस वेळेत पोहचल्यामुळे व्यावसायिकाचा जीव वाचला आहे. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
कल्याण - पार्किंगच्या जुन्या वादातून एका व्यावसायिकाच अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे.
याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून उर्वरित तीन आरोपी फरार आहे. पोलीस वेळेत पोहचल्यामुळे व्यावसायिकाचा जीव वाचला आहे. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
रणजीत झा असे या व्यावसायिकाचे नाव असून डोंबिवली एमआयडीसी परिसरात त्यांची एक फॅक्टरी आहे. दिवा बी आर नगर परीसरात असलेल्या आपल्या जागेवरील मंदिरात ते पूजेसाठी जातात. शरद शेट्टे या व्यक्तीसोबत काही दिवसांपूर्वी रणजीत यांचा गाडी पार्किंगवरून वाद झाला होता. यावेळी संतापलेल्या शरदने रणजीत यांना धमकी देखील दिली होती. शुक्रवारी सायंकाळी रणजित यांकच्या फॅक्टरी बाहेर एक कार उभी होती. या कारमधून काही तरुण बाहेर आले आणि त्यांनी रणजीत यांना मारहाण करत कारमध्ये कोंबले. हा सर्व प्रकार रणजित यांच्या मुलासमोर घडला. या सर्व झटापटीत वडिलांना वाचविण्याच्या प्रयत्नात रणजित यांचा मुलगा देखील कारसोबत फरफटत गेला. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी आरोपींना शोधून काढले. यावेळी बेदम मारहाण झाल्यामुळे रणजित यांची स्थिती नाजूक झाली होती. पोलीस वेळेत पोहचल्यामुळे रणजित यांचा जीव वाचला. मानपाडा पोलिसांनी शरद शेट्टे, समीर मोरे व अन्य एकाला अटक केली असून उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे.