सांगलीतील शासकीय कंत्राटदाराचे अपहरण, तपास सुरु
By शरद जाधव | Published: August 17, 2022 12:03 AM2022-08-17T00:03:02+5:302022-08-17T00:03:25+5:30
कंत्राटदार माणिकराव पाटील शासनाची मोठी कामे घेत असतात. दि. १३ रोजी रात्रीच्या सुमारास ते तुंग येथे कामानिमित्त त्यांच्या मोटारीतून गेले होते. रात्री साडेआठ ते पाऊणेनऊच्या सुमारास त्यांच्या गाडीसह अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले.
सांगली : शहरातील राम मंदिर परिसरातील शासकीय कंत्राटदाराचे त्याच्याच मोटारीतून अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. माणिकराव विठ्ठल पाटील (वय ५४, रा. इंद्रनिल प्लाझा अपार्टमेंट, राममंदिर- सिव्हिल हॉस्पिटल रोड, सांगली), असे कंत्राटदाराचे नाव असून त्यांचा मुलगा विक्रमसिंह यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १३ ऑगस्टरोजी तुंग येथे ही घटना घडली. पाटील यांना जमीन दाखवण्यासाठी बोलावून घेत अपहरण केल्याचे समजते.
कंत्राटदार माणिकराव पाटील शासनाची मोठी कामे घेत असतात. दि. १३ रोजी रात्रीच्या सुमारास ते तुंग येथे कामानिमित्त त्यांच्या मोटारीतून गेले होते. रात्री साडेआठ ते पाऊणेनऊच्या सुमारास त्यांच्या गाडीसह अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले.
घरातून बाहेर पडून खूप वेळ झाला तरी ते न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. सर्वत्र शोधाशोध केली असता ते कोठेही आढळून आले नाहीत, असे त्यांचा मुलगा विक्रमसिंह पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी पाटील कुटुंबियांकडे केलेल्या चौकशीत त्यांना जागा दाखवतो असे फोनवर सांगून तुंग येथे बोलावून घेण्यात आले होते. पोलिसांनी तातडीने या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, त्यात एका ठिकाणाहून आलिशान मोटार जाताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु ठेवला आहे.
जयसिंगपूरजवळ मोटार सापडली -
पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर सुरुवातीला जयसिंगपूरजवळ सीसीटिव्हीमध्ये मोटार दिसून आली होती त्यानंतर पुढेच कोंडीग्रेजवळ त्यांची मोटार बेवारस स्थितीत आढळल्याने गुढ वाढले आहे. पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरत तपास सुरु ठेवला आहे.