म्हणे, त्याने आत्महत्या केली; आईच्या कोलांटउडीने सभापतींच्या मुलाच्या मृत्यूचे गूढ वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 04:26 PM2018-10-22T16:26:05+5:302018-10-22T17:17:08+5:30
उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांचा मुलगा अभिजितच्या मृत्यूचे गुढ अधिकच वाढले आहे.
लखनौ - उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांचा मुलगा अभिजितच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या त्याच्या आईने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच आपल्या मुलग्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे अभिजीतच्या मृत्यूचे गुढ अधिकच वाढले आहे.
अभिजितच्या आईनेच त्याची हत्या केल्याची तसेच तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी सकाळी दिली होती. मात्र या प्रकरणी अटक करण्यात आलेली अभिजीतची आई मीरा यादव यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. माझा मुलगा अभिजीत याने गळफास लावून आत्महत्या केली, असा दावा मीरा हिने केला आहेत. तसेच आपले पती रमेश यादव यांनी मुलाच्या हत्येचा कट रचला होता, असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, मीरा यादव यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
UP Council Chairman's son Abhijeet Yadav murder case: Accused mother has been sent to 14 day judicial custody by Court
— ANI UP (@ANINewsUP) October 22, 2018
उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांचा मुलगा अभिजीत यादवची त्याच्या आईनंच त्याची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. अभिजीत मद्यपान करुन घरी येऊन धिंगाणा घालायचा, म्हणून त्याची हत्या केल्याचे, त्याच्या आईने पोलिसांना सांगितले होते. अभिजीतच्या मद्यपानाच्या सवयीला कंटाळून त्याची हत्या केल्याची कबुली आईने दिली आहे होती.
रमेश यादव यांचा मुलगा अभिजीतचा मृतदेह रविवारी हजरतगंजमधील त्याच्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. या प्रकरणात यादव कुटुंबीयांनी सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल केली होती. अभिजीत शनिवारी रात्री उशीरा घरी आला. त्यावेळी आपल्या छातीत दुखत असल्याचं त्यानं आईला सांगितलं. यानंतर आईनं त्याच्या छातीला मालीश केल्यावर अभिजीत झोपला. सकाळी त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या दृष्टीस पडला, अशी माहिती यादव परिवाराकडून पोलिसांना देण्यात आली होती.
अभिजीतचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं भासवून कुटुंबानं त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा संशय आल्यानं पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबवले. यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. यातून अभिजीतचा मृत्यू गळा दाबण्यात आल्याने झाल्याचं स्पष्ट झाले होते. यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी सुरू केली होती.