नैराश्यातून प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदेने गळफास लाऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 04:04 PM2018-08-23T16:04:43+5:302018-08-23T17:27:05+5:30
अभिजीत शिंदेने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अभिनेता सलमान खान, रणवीर सिंग, तुषार कपूर यांच्यासोबत अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे.
मुंबई - बॉलिवूडचा प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदे याने आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी घरातल्या पंख्याला गळफास घेत अभिजीतने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी अभिजीतने सुसाईट नोट लिहली होती. त्यात त्याने त्याच्या बँकेचे अकाऊंट आपल्या मुलीच्या नावे केलं असल्याचं लिहलं आहे. याबद्दलची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून भांडुप पोलिसांनी ती चिठ्ठी आणि अभिजीतचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद असून काल सकाळी ६. ३० वाजता हि घटना घडली अशी माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांनी दिली. अभिजीत शिंदेने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अभिनेता सलमान खान, रणवीर सिंग, तुषार कपूर यांच्यासोबत अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे.
पुढे खाडे यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी घरातल्या सीलिंग पंख्याला लटकून अभिजीने आत्महत्या केली आहे. त्याच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याने हा सगळा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. अभिजीतला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.प्रसिद्ध डान्सर आणि रॅपर अभिजीत शिंदेची पत्नी त्याला सोडून गेल्या तीन महिन्यापासून माहेरी गेल्यामुळे तो नैराश्यात होता. अभिजीतला 3 महिन्याची मुलगी आहे. मात्र, मुलीला भेटण्यासाठी त्याच्या बायकोने त्याला सक्त नकार दिला. त्यामुळे तो खूप नैराश्यात होता. तर दुसरीकडे हाती कोणतंही काम नसल्याने त्याला त्याचीही काळजी वाटत होती. याच सगळ्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी अभिजीतचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर घटनास्थळावरून हाती लागलेल्या सुसाईड नोटचाही पोलीस तपास करत आहेत.