Video : ७५ रुपयांसाठी "अबोली" रिक्षाचालकाला मारहाण; मीटरप्रमाणे भाडे सांगितल्याने वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 09:17 PM2021-07-14T21:17:01+5:302021-07-14T21:53:56+5:30
Crime News : याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई - मीटर प्रमाणे झालेले भाडे नाकारत चौघा प्रवास्यांनी महिला रिक्षा चालकाला मारहाण केल्याची घटना नेरुळमध्ये घडली आहे. एकाच कुटुंबातील चौघा व्यक्तींनी सीबीडी ते नेरुळपर्यंत प्रवास करून मीटर प्रमाणे झालेले भाडे देण्यास नकार देत हा प्रकार केला. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेलापूर येथे राहणाऱ्या "अबोली" रिक्षाचालक सविता बेले यांच्यासोबत मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. सविता घ्या सीबीडी येथे रिक्षा स्टॅण्डवर असताना त्यांच्याकडे नेरुळला जाण्यासाठी चौघेजण आले होते. परंतु रिक्षात तिघांच्या वर चौथा प्रवासी घेणार नसल्याचे सविता यांनी त्यांना सांगितले. परंतु आपण एकाच कुटुंबातले असून एकासाठी वेगळी रिक्षा करावी लागेल अशी गयावया करून ते रिक्षात बसले. त्यामध्ये एका पुरुष व महिलेसह त्यांच्या मुलगा व मुलीचा समावेश होता. नेरुळ सेक्टर 10 येथे पोचल्यावर सविता यांनी त्यांना मीटर प्रमाणे 75 रुपये भाडे झाल्याचे सांगितले. परंतु आपण नेहमी 50 रुपयात येतो असे बोलत त्यांनी अबोली सोबत वाद घालण्यास सुरवात केली. त्याचवेळी त्या कुटुंबातील मुलीने रिक्षाची चावी काढून घेतली असा सविता यांनी तिला विरोध केला. यावरून चौघांनी मिळून आपल्याला मारहाण केल्याचा सविता यांचा आरोप आहे. तर भररस्त्यात आपल्याला मारहाण होत असताना काही महिला व पुरुष मदतीला धावून आले असता त्यांनाही चौघांनी मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. अखेर रात्री त्यांनी घडलेल्या प्रकाराची तक्रार नेरुळ पोलिसांकडे केली असता एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु चौघांवरही गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
नवी मुंबईत मीटरप्रमाणे झालेले भाडे नाकारत 4 प्रवाशांनी महिला रिक्षा चालकाला मारहाण केल्याची घटना नेरुळमध्ये घडली आहे. एकाच कुटुंबातील 4 व्यक्तींनी सीबीडी ते नेरुळपर्यंत प्रवास करून pic.twitter.com/WhRu9TYVrE
— Lokmat (@MiLOKMAT) July 14, 2021
चौघांकडून मारहाण होत असताना आपण अनेकदा 100 नंबरवर फोन करून पोलीसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु फोन उचलला गेला नाही व त्यामुळे आपल्याला वेळेवर मदत न मिळू शकल्याचा देखील संताप सविता बेले यांनी केला आहे.
महिला रिक्षाचालकाला झालेल्या या मारहाणीचा निषेध अबोली रिक्षाचालक महिलांकडून व्यक्त होत आहे. या घटनेतील सर्व दोषींवर कारवाई करण्याची देखील मागणी अबोली रिक्षा चालक संघटनेच्या उपाध्यक्ष अंजना शिंदे यांनी केली आहे.