कारागृहातील ५० टक्के कैदी आहेत तिशीपार, हत्येच्या गुन्ह्यातील कैद्यांचे प्रमाण अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 07:10 AM2020-12-26T07:10:54+5:302020-12-26T07:11:14+5:30
Crime News : महाराष्ट्रामध्ये एकूण ४३ कारागृहे असून त्यात ९ मध्यवर्ती कारागृहे, एक महिला, तर २८ जिल्हा कारागृहांचा समावेश आहे.
मुंबई : राज्यभरातील कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांमध्ये ५० टक्के कैदी ३० ते ५० वयोगटातील आहेत. यात हत्येच्या गुह्यातील कैद्यांचे प्रमाण अधिक आहे.
महाराष्ट्रामध्ये एकूण ४३ कारागृहे असून त्यात ९ मध्यवर्ती कारागृहे, एक महिला, तर २८ जिल्हा कारागृहांचा समावेश आहे. यात एनसीआरबीच्या २०१९ च्या अहवालानुसार, कारागृहाची एकूण क्षमता २४ हजार ९५ इतकी असताना, कारागृहात एकूण ३६ हजार ७९८ कैदी आहेत.
यात ३५ हजार २२९ पुरुष आणि १ हजार ५६९ महिला कैद्यांचा समावेश आहे. मध्यवर्ती कारागृहाची क्षमता १४ हजार ४९१ असताना त्याच्या दुप्पट म्हणजे २५ हजार ७३१ कैदी या कारागृहामध्ये कोंबण्यात आले आहेत. तर जिल्हा कारागृहातही तीच परिस्थिती असून ८ हजार ८३० कैदी आहेत.
यापैकी मुंबईत दोन मध्यवर्ती आर्थर रोड आणि भायखळा कारागृह आहे. यात महिला कारागृहात २६२ कैद्यांची क्षमता असताना ३६३ महिला कैदी आहेत. या कारागृहामध्ये अंडरट्रायल कैद्यांपैकी १८ ते ३० वयोगटातील १२ हजार ३७३ कैदी आहेत. ३० ते ५० मध्ये १२ हजार ९२८, ५० वर्षे आणि त्यापुढील २ हजार २५६ कैदी आहेत.
तर दोषी सिद्ध झालेल्या कैद्यांमध्ये १८ ते ३० मध्ये २ हजार ५७७, ३० ते ५० मध्ये ५ हजार ३९३ आणि ५० वर्षे आणि त्यापुढील १ हजार १२६ कैद्यांचा समावेश आहे.
१७ हजार कैदी पॅरोलवर बाहेर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात १७ हजार कैद्यांना पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले.
राज्यभरातील कारागृहांमध्ये एकूण १ हजार ५६९ महिला कैदी आहेत, तर भायखळा येथे असलेल्या महिला कारागृहात २६२ कैद्यांची क्षमता असताना ३६३ महिला कैदी आहेत. यात ७२ महिला या आपल्या मुलांसोबत कारागृहात आहेत.
मारेकरी अधिक
गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, कारागृहातील एकूण कैद्यांपैकी १२ हजार ५५ कैदी हे हत्येच्या गुह्यांतील आहेत. यापैकी ५ हजार १९० कैदी दोषी सिद्ध होऊन शिक्षा भोगत आहेत, तर ६ हजार ८६५ जणांवर खटला सुरू आहे.