शंभरी भरली! शिर्डीच्या दुहेरी हत्याकांडातील 10 वर्षांपासून फरार आरोपी मुंबईत सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 22:11 IST2020-01-13T22:10:33+5:302020-01-13T22:11:43+5:30
या आरोपीने रेल्वे प्रवाश्यांचे मोबाईल आणि पाकीट चोरीसारखे जवळपास १०० पेक्षा जास्त गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.

शंभरी भरली! शिर्डीच्या दुहेरी हत्याकांडातील 10 वर्षांपासून फरार आरोपी मुंबईत सापडला
मुंबई - गेल्या १० वर्षापासून शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील फरार तसेच मुंबईत रेल्वेमध्ये जबरीने मंगळसुत्र चोरी करणाऱ्या पोलिसांना पाहिजे असलेल्या आरोपीला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष - ७ कडून विक्रोळी रेल्वे स्थानकावरून जेरबंद करण्यात आले आहे. या आरोपीने रेल्वे प्रवाश्यांचे मोबाईल आणि पाकीट चोरीसारखे जवळपास १०० पेक्षा जास्त गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.
शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अहमदनगर येथील दुहेरी हत्याकांडातील गेल्या १० वर्षांपासून मोक्का गुन्हयातील फरार आरोपीच्या कक्ष - ७ ने विकोळी रेल्वे स्थानकयेथून गुप्त माहितीदारांमार्फत माहितीद्वारे मुसळ्या आवळल्या आहेत. गुप्त माहितीच्या आधारे कक्ष - ७ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दोरकर व पथकाने विकोळी रेल्वे स्थानक, विकोळी (पूर्व) , या ठिकाणी जाऊन फरार आरोपीच्या वर्णनानुसार शोध घेतला असता, तो एका मंदिर परिसरामध्ये आढळून आला. या आरोपीला कक्ष - ७च्या कार्यालयात आणून त्याचेकडे कौशल्यपुर्वक चौकशी केली असता प्रथम त्याने सन २०११ मध्ये शिर्डी येथील पाप्या शेख टोळीने इसम नामे प्रविण गोदकर व रवीत पटनी यांचा खून केला होता. या खुनाबाबत शिर्डी पोलीस ठाणे येथे नोंद असलेला गुन्हा भा. दं. वि. कलम ३०२, १२०५, ३६३, ३६४, ३६८, १४३, १४७, १४८, १४९, २०१, ३४२,४६३, ४६४,२१६ सह कलम ३(१).३(२).३(४) मोक्का कायद्यांतर्गत दाखल आहे. आरोपीस अटक झाली होती. या गुन्हयातून जामीनावर मुक्त झाल्यानंतर तो अदयापपर्यंत फरार झाला होता. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता नाशिक येथील विशेष मोक्का न्यायालय यांनी या आरोपीस फरार घोषित केले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
तसेच नमुद अटक आरोपीकडे अधिक कसून चौकशी केली असता, त्याने त्याच्या साथीदारांसह सी.एस.एम. टी. रेल्वे स्थानक परिसरात एका रेल्वे महिला प्रवाश्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने चोरल्याचे कबूल केले. या प्रकरणी सी.एस.एम.टी. रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद असल्याची खात्री झाल्यानंतर नमूद आरोपीत यास पुढील कारवाईसाठी सी.एस.एम.टी. रेल्वे पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या आरोपीने रेल्वे प्रवाश्यांचे मोबाईल आणि पाकीट चोरीचे जवळपास १०० पेक्षा जास्त गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. त्याबाबत त्याला अद्यापपर्यंत अटक झाली नसल्याचे त्याने सांगितले आहे. नमुद आरोपी हा मुंबईतील रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत गु्हयासंदर्भातील अभिलेख्यावरील आरोपी असून नमुद आरोपीस यापुर्वी एकूण ৪ गुन्ह्यांत न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे. तसेच सदर आरोपीस २०१८ कालावधीमध्ये दादर पोलीस ठाण्याकडून तडीपारची कारवाई करण्यात आली होती.