शिक्षा कमी करण्यासाठी अबू सालेम विशेष कोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 08:59 AM2024-01-16T08:59:55+5:302024-01-16T09:00:09+5:30
या गुन्ह्यात आपल्याला दोषी ठरविण्यापूर्वी आपण जो काळ कारागृहात घालविला तेवढी वर्षे जन्मठेपेच्या शिक्षेत मोजावी आणि जन्मठेपेच्या शिक्षेचा काळ १४ वर्षे धरावा, अशी मागणी सालेमने न्यायालयात केली.
मुंबई : १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम याने त्याला ठोठावण्यात आलेली शिक्षा कमी करण्यासाठी विशेष टाडा न्यायालयात धाव घेतली आहे. या गुन्ह्यात आपल्याला दोषी ठरविण्यापूर्वी आपण जो काळ कारागृहात घालविला तेवढी वर्षे जन्मठेपेच्या शिक्षेत मोजावी आणि जन्मठेपेच्या शिक्षेचा काळ १४ वर्षे धरावा, अशी मागणी सालेमने न्यायालयात केली.
पोर्तुगाल सरकारने सालेमला भारताचा ताबा दिल्याने त्यांच्या कायद्यानुसार, सालेमला फाशीची शिक्षा किंवा २५ वर्षांहून अधिक शिक्षा होऊ शकत नाही, असे सालेमच्या वकील फरहाना शहा यांनी अर्जात म्हटले आहे. सालेमला २५ वर्षांहून अधिक काळ शिक्षा होणार नाही, असी हमी पोर्तुगाल सरकारला दिली असली तरी त्याला भारतीय कायद्यानुसार झालेली १४ वर्षांची शिक्षा कमी करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.