खडके बालगृहात मुलावरही अत्याचार, संस्थाध्यक्ष, पंडितसह चार जणांवर गुन्हा
By चुडामण.बोरसे | Published: July 29, 2023 10:05 PM2023-07-29T22:05:29+5:302023-07-29T22:06:52+5:30
काळजी वाहकावर दुसरा गुन्हा
बी.एस. चौधरी, एरंडोल (जि.जळगाव): खडके बुद्रूक येथील मुलींच्या बालगृहातील लैंगिक अत्याचार व शोषणाचे प्रकरण गाजत आहे. आता याच संस्थेच्या मुलांच्या बालगृहात एका ११ वर्षीय मुलावर शारीरिक व लैंगिक अत्याचार व त्यास मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याबाबत काळजीवाहक शिवाजी पंडितसह संस्थाध्यक्ष अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश शिवाजी पंडित (२९), संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ दादाजी यशवंत पाटील (६०), सचिन प्रभाकर पाटील (३०), भूषण प्रभाकर पाटील (२८, रा. ओमनगर धरणगाव रोड, एरंडोल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. खडके बुद्रूक येथील कै. यशवंतराव बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मुलींच्या बालगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणात येथील काळजीवाहक शिवाजी पंडित याच्यावरील हा दुसरा गुन्हा आहे.
११ वर्षीय बालकाने दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, होळी सणाच्या दिवशी त्याने पाणी भरण्यास नकार दिला होता. यामुळे आरोपी गणेश याच्या सांगण्यावरून वसतिगृहातीलच आठ विधिसंघर्षित मुलांनी या बालकाला लाथाबुक्क्यांनी पाठ, छाती व पोटावर मारहाण केली होती. तसेच एका रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा बालक वॉशरूमला गेला होता. त्याचवेळी वसतिगृहात कोणी नसल्याचा फायदा घेत गणेशने त्याच्यावर शारीरिक व लैंगिक अत्याचार केला. ही घटना संस्थेच्या अध्यक्ष व शिक्षकांना सांगितली. त्यावेळी त्यांनीही दुर्लक्ष केले.
या बालकाचे बालकल्याण समितीसमोर जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर एरंडोल पोलिसात वरील चारही जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडित मुलींबाबत महिला बालकल्याण समिती चौकशी करीत असताना याच वसतिगृहात आता दुसरा प्रकारही उघडकीस आला आहे. दरम्यान, या फिर्यादी बालकाला मारहाण करणाऱ्या सातही अल्पवयीन बालकांना सध्या जळगाव येथील मुलांच्या निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. तपास एरंडोलचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे हे करीत आहेत.