अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधमाला २० वर्षांची सक्तमजुरी; १ लाख ५५ हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 08:52 AM2023-03-10T08:52:36+5:302023-03-10T08:54:35+5:30
मिनीडोअर रिक्षामध्ये प्रवास करीत असताना ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयानं ठोठावली शिक्षा.
अलिबाग : मिनीडोअर रिक्षामध्ये प्रवास करीत असताना ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला माणगाव सत्र न्यायालयाने २० वर्षांची सक्तमजुरी व एकूण १ लाख ५५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. पुंडलिक मधुकर तर्डे असे त्याचे नाव असून, १ मार्च २०२० रोजी महाड येथील टोळ गावच्या हद्दीत त्याने हे कृत्य केले होते. विशेष व सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी महिला दिनाच्या दिवशी शिक्षा सुनावली.
एक दाम्पत्य ११ वर्षांच्या मुलीसह विक्रम रिक्षाने महाड ते वीर असा प्रवास करीत होते. मुलीच्या शेजारी पुंडलिक तर्डे बसला होता. विक्रम रिक्षा टोळ गावच्या हद्दीत येताच तर्डेने पीडित मुलीच्या मांडीवर ठेवलेल्या पिशवीच्या खालून हात घालीत तिच्याशी लैंगिक चाळे केले. या घटनेची महाड तालुका पोलिसांनी फिर्याद घेतली होती. पुंडलिक तर्डेविरोधात भा.दं.वि.सं. कलम ३७६ सह पोक्सो ४, ८ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक नितीन एम. गवारे यांनी करीत दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालय माणगाव येथे दाखल केले. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायालय, माणगाव-रायगड येथे झाली.
पीडित मुलीची साक्ष ठरली महत्त्वाची
गुन्ह्यात पीडित मुलीची साक्ष व फिर्यादी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकारच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता योगेश तेंडुलकर यांनी काम पहिले. पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक यू.एल. धुमास्कर, मपोह छाया कोपनर, पोह शशिकांत कासार, शशिकांत गोविलकर, सोमनाथ ढाकणे यांनी सहकार्य केले. विशेष व सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी पुंडलिक तर्डे याला दोषी ठरवून कलम ३७६ (१) अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व रु. ५० हजारांचा दंड, कलम ४ अन्वये २० वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपयांचा दंड, कलम ८ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी व १ लाख ५५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.