अल्पवयीन मुलाला मारहाण करत अत्याचार; वडिलांनी पोलिसांत दिली तक्रार, मुंबईतील घटना
By मनीषा म्हात्रे | Updated: March 1, 2024 17:17 IST2024-03-01T17:16:51+5:302024-03-01T17:17:17+5:30
कुर्ला परिसरात १३ वर्षीय मुलगा कुटुंबियांसोबत राहण्यास आहे.

अल्पवयीन मुलाला मारहाण करत अत्याचार; वडिलांनी पोलिसांत दिली तक्रार, मुंबईतील घटना
मुंबई : कुर्ला परिसरात सायंकाळच्या सुमारास घराकडे निघालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला मारहाण करत त्याला घरात डांबले. एवढ्यावरच न थांबता त्याच्यासोबत लैगिक अत्याचाराचा प्रयत्न करत अश्लील वर्तन केले. अखेर, मुलाकडून घडलेला प्रकार समजताच वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस अधिक तपास करत आहे.
कुर्ला परिसरात १३ वर्षीय मुलगा कुटुंबियांसोबत राहण्यास आहे. बुधवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास मुलगा घरी जात असताना त्याच परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय आरोपीने त्याला अडवले. एका नातेवाइकाबाबत चौकशी करत त्याला मारहाण सुरु केली. नेमके काय कशासाठी सुरु आहे हे समजण्याच्या आतच अल्पवयीन मुलाला घरात कोंडले. त्यानंतर त्याच्यासोबत लैगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकाराने मुलगा घाबरला. त्याने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी तात्काळ विनोबा भावे नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी मुलासोबत चुकीचे वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.