कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाकडून गटविकास अधिकारी, वाहनचालकास शिवीगाळ व मारहाण; सोमाटणे येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 09:35 PM2020-07-28T21:35:34+5:302020-07-28T21:35:57+5:30
कोरोना पॉझिटिव्ह आईला घेऊन जाण्यासाठी आल्याच्या संशयातून कृत्य
पिंपरी : कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या गटविकास अधिकाऱ्यांसह त्यांच्या वाहनचालकास शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. सोमाटणे ग्रामपंचायत कार्यालय येथे सोमवारी (दि. २७) सायंकाळी ही घटना घडली. मारहाण करणारी व्यक्ती व त्याची आई कोरोना पॉझिटिव्ह आहेत. आपल्या आईला घेण्यासाठीच हा ताफा आला असल्याचा संशय आल्याने मारहाण केल्याचे त्याने सांगितले.
या प्रकरणी शासकीय वाहनाचे चालक शिवाजी पांडुरंग पाटील (वय ५५, रा. चौधरी पार्क, दिघी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सोमाटणे येथील ३५ वर्षीय व्यक्तीविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे ग्रामपंचायत हद्दीत कोरोना रुण वाढत आहेत. त्यामुळे याबाबत आढावा घेण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. त्यानुसार मावळचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत सोमवारी सोमाटणे गावात गेले होते.
ग्रामपंचायत कार्यालयात आढावा घेत असताना त्यांचा वाहनचालक शिवाजी पांडुरंग पाटील यांना आरोपी याने तोंडाचा रुमाल आवळून शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. यावेळी त्यांच्यात झटापट झाली. झटापट सोडवण्यासाठी गटविकास अधिकारी सुधीर भागवत आले असता त्यांनाही मारहाण व दमदाटी केली.
दरम्यान, ग्राम विकास अधिकारी राजेंद्र वाघमारे, लिपिक जीवन गायकवाड, शिपाई कैलास तुकाराम मुºहे घटनास्थळी धावून आले. त्यानंतर आरोपी याला ग्रामपंचायत कार्यालय कोंडले. त्याला विचारपूस केली असता, माझी आई कोरोना पॉझिटिव्ह असून माझ्या आईला घेऊन जाण्यासाठी आले असल्याचा संशय आला. त्यामुळे मी शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली, असे त्याने सांगितले. पोलीस उपनिरीक्षक नीलेश बोकेफोडे तपास करत आहेत.