भाजपा आमदार अडचणीत; महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 08:35 PM2019-09-18T20:35:02+5:302019-09-18T20:44:08+5:30

आमदारासह भाजपा शहर अध्यक्षावर गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Abusive language used to lady PSI: Crime case registered against BJP MLA Charan Waghmare of Tumsar | भाजपा आमदार अडचणीत; महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

भाजपा आमदार अडचणीत; महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे बांधकाम कामगार कीट वितरणप्रसंगी महिला पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.तुमसर येथे बांधकाम कामगार कीट वाटप कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गोंधळ होत आहे.गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.

भंडारा- पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा गंभीर गुन्हा भाजपाचेआमदार चरण वाघमारे यांच्यावर दाखल झाला आहे. बांधकाम किट वितरण प्रसंगी महिला पोलीस निरीक्षकाला शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आमदार वाघमारेंसह भाजपा शहर अध्यक्षावरही विनयभंगासह शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

महिला सुरक्षेचं आश्वासन भाजपानं निवडणुकीपूर्वी दिलं होतं. मात्र त्याच पक्षाच्या आमदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. कामगारांना किट वाटप केलं जात असताना आमदार वाघमारेंनी महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. १६ सप्टेंबरला हा प्रकार घडला. रात्री किट वाटप होणार असल्याची माहिती कामगारांना मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष बांधकाम कामगार एकत्र जमले. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून तुमसर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक तैनात होत्या. 

किट वाटप सुरू असताना गोंधळ होऊ नये म्हणून महिला व पुरुषांची स्वतंत्र रांग लावण्यात आली होती. त्यावेळी महिलांच्या रांगेत असलेल्या एका गरोदर महिलेला त्रास झाला. त्या महिलेशी पोलीस उपनिरीक्षक बोलत असताना भाजपाचे शहर अध्यक्ष अनील जिभकाटे तिथे आले. त्यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याचा एकेरी उल्लेख करुन वाद घातला. याशिवाय अर्वाच्य भाषेत शिवीगाळदेखील केली. त्यावेळी आमदार चरण वाघमारेही तेथे उपस्थित होते. मात्र आमदारांनी हा प्रकार थांबवण्याऐवजी आपली खिल्ली उडवून अपमान केला, अशी तक्रार संबंधित महिला पोलीस उपनिरीक्षकांनी तुमसर पोलीस ठाण्यात दिली.

या प्रकरणी आज संध्याकाळी आमदार चरण वाघमारे यांच्यासह भाजपा शहर अध्यक्ष अनील जिभकाटे यांच्याविरुद्ध भा. दं. वि. ३५३, ३५४, २९४, ५०४, ५०६, ३४ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मनोज सिडाम करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदाराविरोधात विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानं जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

कामगार किट वाटप प्रसंगी मी उपस्थित होतो. माझी बाचाबाचीही झाली. परंतु आमच्यावर जे गुन्हे दाखल झाले, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. या ठिकाणी शेकडो कामगार उपस्थित होते. त्यांचा जबाब घ्यावा, चौकशी करावी. मी दोषी असेन, तर निश्चितच शिक्षा द्यावी. एखाद्या अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधीची तक्रार करणे अशोभनीय आहे. ही तक्रार राजकीय द्वेशातून आणि सूडबुद्धीने करण्यात आली आहे. -आमदार चरण वाघमारे, तुमसर  
 

Web Title: Abusive language used to lady PSI: Crime case registered against BJP MLA Charan Waghmare of Tumsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.