नळ जोडणीकरिता लाच घेणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यास एसीबीने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 09:17 PM2020-01-17T21:17:28+5:302020-01-17T21:20:12+5:30
मीरा भाईंदर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील पाणी पुरवठा विभागात नविन नळ जोडणी वा अन्य जलवाहिनीवरुन देण्यासाठी चालणाऱ्या गैरप्रकारांच्या तक्रारी व आरोप सातत्याने होत आले असतानाच आज शुक्रवारी पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यास नळ जोडणी करुन देण्यासाठी साडे आठ हजार रुपयांची लाच घेताना साथीदारासह ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेअटक केली आहे.
नवघर पोलीस ठाणे हद्दीतील एका गृहनिर्माण संस्थेने अपुरा पाणी पुरवठा होतो म्हणुन महापालिकेने त्याच भागात टाकलेल्या नविन जलवाहिनीतुन नळ जोडी देण्यासाठी अर्ज केला होता. आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरल्यानंतर नव्या जलवाहिनीवरुन नळ जोडणी मंजूर झाली. सदर नळ जोडणी पालिकेच्या नव्या जलवाहिनीतून करुन देण्यासाठी गृहनिर्माण संस्थेने पालिकेत दिड हजार रुपयांचे शुल्क देखील भरले.
तसे असताना नळ जोडणी करण्यासाठी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील फिटर रॉयर पॅरियन (५२ ) रा. भोला नगर, भाईंदर पश्चिम स्मशाना जवळ याने साडे आठ हजार रुपयांची मागणी केली. या प्रकरणी संस्थेने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर पोलीसांनी १५ जानेवारी रोजी खात्री करुन घेतली. त्यानंतर आज शुक्रवारी सापळा रचून लाचेची रक्कम घेताना पॅरियनसह त्याचा खाजगी साथीदार बाबु राजेंद्रन (२५) या दोघांना पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शना खाली उपअधीक्षक शशिकांत चांदेकर सह खान, टेतांबे व बजागे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पॅरियन हा सदरची रक्कम कोणासाठी घेत होता वा त्यात कोणा कोणाला वाटणी जात होती याचा तपास पोलीस करत असल्याचे सुत्रांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच पालिकेच्या जन्म मृत्यु विभागातील अधिकाऱ्यास २० हजाराची लाच घेताना अटक झाली होती.